News Flash

वृक्षलागवडीसाठी वनविभागाची हरितसेना

ठाणे वनविभागाच्या वतीने १६ लाख ६७ हजार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

वृक्ष लागवड

 

ठाणे जिल्ह्य़ात ६९ हजार ४६९ सभासदांची नोंदणी

येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वनविभागातर्फे नागरिकांना सवलती जाहीर करत सुरूकरण्यात आलेल्या महाराष्ट्र हरित सेना प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठाणे जिल्ह्य़ातून ६९ हजार ४६९ सभासदांनी नोंदणी केली आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवडीसाठी ठाणे जिल्ह्य़ाला १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी ठाणे वनविभागाच्या वतीने १६ लाख ६७ हजार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. हरित सेना संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील सभासदांमुळे या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पार करणे सोपे जाईल, असा दावा ठाणे वनविभागातर्फे करण्यात आला आहे.

वनविभागाशी संबंधित असलेल्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे हरित सेना प्रकल्पाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून हरित सेना संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या सभासदांना वनविभागाच्या उपक्रमांविषयीची माहिती उपलब्ध होते. ठाणे जिल्ह्य़ातील ६९ हजार ४६९ नागरिकांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली असून वृक्षलागवडीच्या काळात या सभासदांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल, अशी माहिती ठाणे वनविभागातर्फे देण्यात आली.

हरित सेना म्हणून नोंदणी झालेले सभासद त्यांनी केलेल्या वृक्ष लागवडीची माहिती संकेतस्थळावर नोंदविणार आहेत. त्यामुळे नेमकी किती आणि कुठे लागवड झाली, याची अधिक अचूक माहिती वन विभागाकडे उपलब्ध होईल, असा विश्वास ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर, चित्ररथ, एनसीसी, विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोपवन स्थळांची निर्मिती

रोपनिर्मितीसाठी रोपवन स्थळांची निश्चिती वनविभागातर्फे करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, शहापूर, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ठाणे, इतर यंत्रणा, ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्र, बदलापूर नगरपरिषद, भिवंडी, वसई, कल्याण या ठिकाणी

नऊ वनमहोत्सव केंद्रे सुरू करण्यात आली असून या ठिकाणी रोपे उपलब्ध आहेत.

chart

हरितसेना नोंदणी कशी करावी?

  • ma-mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ‘green army registration click here’ या पर्यायाची निवड करावी.
  • संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, पासवर्ड, लिंग आणि जन्मतारीख अशी माहिती भरल्यावर नोंदणी करता येऊ शकते.
  • सदस्य नोंदणी करताना नागरिकांना पर्यावरणाशी संबंधित आपल्या आवडीचा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यात पक्षीनिरीक्षण, वनपर्यटन, जलसंवर्धन, वन्यजीव, ट्रेकिंग असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची स्वाक्षरी असलेले महाराष्ट्र शासनाचे ‘महाराष्ट्र हरितसेना’ सदस्यत्व प्रमाणपत्र स्वयंसेवकांना ऑनलाइन उपलब्ध होते. सदस्य या प्रमाणपत्राची प्रत घेऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:15 am

Web Title: tree plantation campaign forest department
Next Stories
1 शाळेतील पहिल्या पावलाचा ठसा
2 सीमेंट रस्त्याला डांबराचा आधार
3 शासकीय संथ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
Just Now!
X