शहर विद्रुपीकरणासह पर्यावरणाला धोका

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत जाहिरात फलकबाजीचा प्रश्न अधिक जटिल झाला असतानाच आता या जाहिरातींकरिता पुन्हा झाडांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील झाडांवर  सर्रासपणे खिळे मारण्यात येत असून त्यांच्या  जिवाला धोका निर्माण झाला असल्याने पर्यावरणप्रेमी वर्ग आक्रमक झाला आहे.

मीरा-भाईंदर  महापालिका क्षेत्रात दोन  लाखांहून अधिक झाडे आहेत.पालिकेने ही झाडे लागवड करून जतन केलेली आहेत.या झाडांमुळे शहराची शोभा वाढवून ते पर्यावरणाच्या रक्षणात मोठी भूमिका बजावत असतात. मात्र या झाडांचा वापर जाहिरात फलकांसाठी केला जात आहे. इतर ठिकाणी जाहिराती लावल्यास पालिका प्रशासन  त्यावर कर आकारते, तसेच विनापरवानगी जाहिराती काढून टाकते. यामुळे अनेक व्यावसायिक आपल्या जाहिराती झळकवण्यासाठी झाडांचा वापर करत आहेत. यात प्रामुख्याने शिकवण्या, दवाखाने, टय़ुशन,  कंपन्यातील  नोकऱ्या, सुरक्षाबल भरती अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जात आहेत. यात आता भर म्हणजे विविध पक्षांतील राजकीय पदाधिकारी देखील झाडांचा वापर आपल्या जाहिरात फलकांकरिता करत आहे.त्यामुळे इतर नागरिक नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरांतील  झाडाच्या  संवर्धनाबाबत  पालिकेकडून  अनेक वेळा  धोरण निश्चित करण्यात आले आहेत.परंतु  या धोरणांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे  झाडांना इजा पोहचतच आहे. त्याचप्रकारे शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक, दुकानांसमोरील जागा, झाडे, पथदीपांवर अनधिकृतपणे जाहिरातींचे फलक लटकविले जात असल्याने शहराच्या विद्रुपीकरणात ही भर पडत आहे. सध्या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे झाडाचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने  पालिकेकडून  झाडाच्या  सुरक्षेचा प्रश्न  गांभीर्याने घेण्याची गरज असल्याची मागणी पर्यावरण प्रेमीं राज पाटील यांनी  केली आहे.तर या संदर्भात अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साध्यण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.