’शहर हिरवे करण्यासाठी मोठय़ा प्रयत्नाने ठिकठिकाणी लावण्यात आलेली झाडे जूनमधील पावसात उन्मळून पडली. याविषयी पर्यावरणप्रेमींना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. मात्र वृक्ष लागवड करताना तसेच त्यांची निगा राखताना पुरेशी काळजी घेतली तर असे प्रकार टाळता येणे सहज शक्य आहे. एक तर शहरात मुख्यत्वे करून रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आलेली असते. साधारणत: पावसाळ्याआधी प्रत्येक शहरातील स्थानिक प्रशासन वीजवाहिन्यांवर आलेल्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करतात. मात्र छाटणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना याविषयी कोणतीही शास्त्रीय माहिती नसते. ते धरसोड पद्धतीने फांद्या छाटून टाकतात. त्यामुळे झाडाचा समतोल बिघडतो. मग अशी झाडे वाऱ्याचा मारा सहन करू शकत नाहीत. त्यामुळे झाडांची छाटणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
’दुसरे महत्त्वाचे म्हणजे रस्ते खोदाई अथवा भुयारी गटार योजनेत झाडांच्या मुळांची अपरिमित हानी होते. अशा प्रकारे पायालाच इजा पोहोचल्याने वृक्ष कमकुवत होतात.
’तिसरे म्हणजे हल्ली शहरी भागात तयार झाडे आणून लावली जातात. खोडाच्या तुलनेत या झाडांच्या मुळांची नीटशी वाढ झालेली नसते. त्यामुळे जरा जोराचा पाऊस अथवा वारा आला की अशी झाडे आडवी होतात.
’शहरात मोठय़ा प्रमाणात फरशीकरण सुरू असते. त्यामुळे सोसायटीच्या आवारातही फारशी मोकळी जमीन दिसत नाही. लोक हौसेने रोप लागवड करतात, पण त्या रोपाच्या निकोप वाढीसाठी त्याची मुळे जमिनीत खोलवर जाणे अत्यंत आवश्यक असते. मात्र शहरी वृक्ष लागवडीत झाडाखाली मुळांच्या वाढीसाठी फारच थोडी जागा शिल्लक असते. परिणामी थोडी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की ते मान टाकतात.
’शक्यतो जांभूळ, गुलमोहोर, बुच ही झाडे लावू नयेत. कारण ती लवकरच कुजतात. त्याऐवजी बहावा, ताम्हाणे, बकुळ या वृक्षांची लागवड करावी. सौदर्यीकरण, सावली आणि पर्यावरणरक्षण या तिन्ही दृष्टींनी हे लाभदायक आहे. शहरात वृक्षांची लागवड करताना एवढी काळजी घेतली तर ते वाऱ्याला निश्चितच तोंड देतील.
– राजेंद्र भट