महापालिकेच्या‘तकलादू’ पर्यावरणप्रेमावर टीका
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महावृक्ष अभियानानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरभर कानाकोपऱ्यात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली असली तरी यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर रोपण करण्यात आलेली वृक्षवल्ली नामशेष होऊ लागल्याने महापालिकेने हे पर्यावरणप्रेम ‘तकलादू’ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शासनाची दोन कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना पूर्ण करण्यासाठी गेल्या आठवडय़ात राज्यभर विविध शासकीय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर अभियान राबविण्यात आले. एकाच दिवशी कोटय़वधी रोपांचे रोपण करताना अनेकांनी सेल्फी काढून घेण्याची हौसही पुरेपूर भागवून घेतली. महापालिका हद्दीत भाजपचे तीन आमदार असल्याने कल्याण डोंबिवली शहरातही वृक्षरोपणाचा उत्साह काही और होता. शहरातील तिन्ही आमदार, महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी जागोजागी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसले. हे चित्र सुखावणारे असले तरी महापालिकेने यापूर्वी रस्ता दुभाजकांवर रोपण केलेल्या झाडांची अवस्था पाहता महावृक्षारोपण मोहिमेचे फलित काय येईल, याविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये साशंकता आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत रस्ते चकाचक करण्यात आले. त्यांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी पालिका प्रशासन रस्ता दुभाजकांच्या मध्ये वृक्ष लागवडही करते. परंतु त्यांची पुढे निगा राखली जात नाही. उन्हाळ्यात ही झाडे पाण्याअभावी जळून जातात. झाडे जर जगणार नसतील तर पालिकेच्या पैशांची उधळपट्टी तरी का केली जाते असा सवाल सर्वसामान्यांमधून केला जात आहे. राजकीय पुढारी येणार असतील त्यावेळी रस्त्यांची डागडुजी होते, शहर स्वच्छ होते. परंतु हे चित्र दररोज आम्हाला कधी पाहायला मिळणार. पालिकेचे अधिकारीच काम नीट करून घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल शामकांत औटी यांनी केला.

डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली नाका, शेलार चौक भागात रस्ता दुभाजकांमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात रस्ता सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील बडय़ा नेत्यांची कल्याण डोंबिवली वारीही नित्यनेमाने सुरू झाली होती. नववर्ष स्वागतानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली शहराला भेट दिली. मुख्यमंत्री येणार असल्याने या चौकातील दुभाजकांमध्ये तांबडी माती टाकण्यात आली. तसेच या ठिकाणी तीन फूट उंचीची झाडे लावण्यात आली. रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली होती. असे असताना इनमिन सहा महिन्यांमध्ये या दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली नामशेष झाल्याने महापालिकेच्या बेजबाबदारपणाविषयी टीकेची झोड उठत आहे.