फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइट्समुळे तरुणाईला आपले विचार मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. मात्र, हे व्यासपीठ केवळ चर्चा, वाद, संवाद, गप्पा यापुरतेच मर्यादित न ठेवता संघटक शक्ती म्हणूनही त्याचा वापर होऊ लागला आहे. याचेच प्रत्यंतर गिर्यारोहण अथवा ट्रेकिंगच्या बाबतीत येत असून महाराष्ट्रातील विविध गड, किल्ले, डोंगररांगा यांच्यावरील चढाई मोहिमांचा फेसबुकवरून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांतील अनेक गडदुर्ग, डोंगरमाथे गिर्यारोहकांना खुणावत असतात. पावसाळय़ात तर येथील निसर्गसौंदर्य आणखी बहरत असल्याने या काळात अनेक चढाई मोहिमा आखल्या जातात. काही मोठय़ा संस्था, संघटना सोडल्या, तर बाकीच्या गटांच्या चढाई मोहिमांचा प्रसार मित्रामित्रांपुरताच मर्यादित होत असे. अशा गटांना आता फेसबुकचे व्यासपीठ लाभले आहे. सध्या अनेक ‘ट्रेकिंग ग्रुप्स’ आपल्या चढाई मोहिमांच्या जाहिराती, वर्णने, छायाचित्रे फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. बहुतांश गटांनी फेसबुकवर स्वतंत्र ‘ट्रेकिंग पेज’, ‘ट्रेकिंग ग्रुप’ बनवले असून त्यांना अन्य फेसबुकधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेसबुकवरील अनेक ‘ट्रेकिंग ग्रुप्स’मधील सभासदांची संख्या १५-२० हजारांच्या घरात गेली आहे.
या ट्रेकिंग ग्रुप्सवर आगामी मोहिमांचे वेळापत्रक, गड-किल्ल्यांची माहिती, आकारण्यात येणारे शुल्क, मोहिमेचा एकूण खर्च, ट्रेकिंगसाठी घ्यावयाची काळजी, आवश्यक साहित्य आदी गोष्टींची इत्यंभूत माहिती देण्यात येते. इतकेच नाही तर ‘ट्रेक इट इझी’ नावाच्या ग्रुपने चढाई मोहिमेचे शुल्क परस्पर बँकेत जमा करण्यासाठीची माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एकमेकांना ओळखत नसतानाही फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेली मंडळी एकत्रितपणे चढाईचा थरार अनुभवत आहेत.

फेसबुकवरील प्रसिद्ध ट्रेकिंग ग्रुप्स
* ट्रेक मेट्स इंडिया- २२,७०७ सभासद
* ट्रेक अ‍ॅण्ड ट्रेल्स इंडिया- ८,३३७
* ट्रेकडी- २,८१०
* ट्रेक इट इझी- १,७२३
* ट्रेकक्षितिज.कॉम- १,७११
* ट्रेकिंग पॅराडाइज- १,०३५

पूर्वी मेसेज किंवा मेलच्या माध्यमातून ओळखीच्या लोकांपर्यंतच ट्रेकिंगची माहिती घेऊन पोहोचता येत होते; परंतु सोशल नेटवर्किंग साइट्समुळे अधिकाधिक दुर्गप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. सोशल नेटवर्किंग साइट्समुळे गिर्यारोहकांचे वय, ते राहत असलेली जागा लक्षात घेऊन ट्रेक आयोजित करणे सोपे जाते.  
– प्रणव दाते, ‘ट्रेक इट इझी’