पहिल्या पावसाची सर येऊन जाते, तेव्हा घरातल्या छत्रीची शोधाशोध सुरू होते. कुठल्या तरी कोनाडय़ात ठेवलेली छत्री काढून घासूनपुसून पावसासाठी सज्ज केली जाते. पण एवढे करूनदेखील दरवर्षी बाजारात दाखल होणाऱ्या रंगीबेरंगी छत्र्या खरेदी करण्याचा मोह आवरत नाहीच. आता तर छत्र्यांचे एकापेक्षा एक ‘अवतार’ पाहायला मिळत असून छत्री ही पावसाळय़ातील एक फॅशन स्टेटमेंट ठरू लागले आहे. त्यामुळेच विविध शब्दांची कॅलिग्राफी असलेल्या किंवा अॅबस्ट्रक्ट चित्रे असलेल्या ‘चिकी चंक’ छत्र्या यंदा अधिक ग्राहकपसंती मिळवीत आहेत. अशा छत्र्यांमुळे ई-कॉमर्स संकेतस्थळावरील बाजारही सध्या गजबजल्याचे पाहायला मिळत आहे.

‘चिकी चंक’ म्हणजे नेहमीच्या छत्र्यांपेक्षा वेगळय़ा आणि वैशिष्टय़पूर्ण नक्षीकाम असलेल्या छत्र्या यंदा जास्त लोकप्रिय ठरत आहेत. अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवर तर ‘चिकी चंक’ नावाचा वेगळा वर्गच तयार करण्यात आला आहे. या वर्गात न्यूजप्रिंट (वर्तमानपत्राचे चित्र), ‘वडापाव’,‘इंडिया म्युझिक’ अशा शब्दांची नक्षी असलेल्या छत्र्या, अमूर्त शैलीतील नक्षी असलेल्या छत्र्या पाहायला मिळतात. विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये अशा छत्र्यांची फॅशन अधिक लोकप्रिय ठरू लागली आहे.

याशिवाय, एके काळी ‘आजोबांची’ म्हणून ओळखली जाणारी काळी लांब दांडा असलेली छत्री यंदाही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. तर पोल्का डॉट्सवाल्या, रंगीबेरंगी झालर असलेल्या छत्र्या मुलींमध्ये प्रसिद्ध आहेत. लहान मुलांसाठीही ‘कार्टून’ची चित्रे छापलेल्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. तर ‘आयफेल टॉवर’,‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ अशा जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांचा छाप असलेल्या छत्र्याही पाहायला मिळत आहेत. बाजारात साध्या छत्र्या दीडशे रुपयांपासून उपलब्ध असल्या तरी नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी छत्र्या चारशे ते एक हजार रुपयांच्या किमतीत विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, किंमत जास्त असली तरी त्यांच्याकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे.