X

शाळेच्या बाकावरून : समाजसेवेचे कंकण बांधुनी..

येऊरची निसर्गसंपदा हे आपल्या ठाणे शहराला मिळालेले निसर्गाचे एक वरदान आहे.

येऊरची निसर्गसंपदा हे आपल्या ठाणे शहराला मिळालेले निसर्गाचे एक वरदान आहे. विशेषत: पावसाळा सुरू झाल्यावर सृष्टीचे खुललेले रूप आपल्याला इथे अनुभवता येते. येऊरचे हिरवेगार सृष्टीसौंदर्य, ताजी हवा, सुंदर पक्षी व त्यांचा गोड किलबिलाट, मनमोहक रंगाची फुले हे सगळे वातावरण आयुष्यातला ताणतणाव, समस्या यांचा विसर पडायला तर लावतोच, पण भरभरून सकारात्मक ऊर्जाही देणारे असते. जसजसे आपण वर चढत जातो, बरेच आत गेल्यावर आदिवासी बांधव दिसू लागतात. येऊर गाव,  पाठोण पाडा, रामाचा पाडा, जांभूळ पाडा, नारळी पाडा असे फलक दिसू लागतात. ठाणे शहर उंच उंच टॉवर, भव्य मॉल्स, गृहनिर्माण प्रकल्प, फ्लायओव्हर्स, इंटरनॅशनल स्कूल्स अशी कात टाकत असताना, आधुनिक चेहरामोहरा धारण करीत असताना आदिवासी बांधव मात्र यापासून कोसो दूर आहेत.

आज या पाडय़ांवर जाऊन जवळून त्यांचे जगणे अनुभवल्यास जगण्याचे वास्तव रूप सहज दिसून येते. काहींची विटासिमेंटची, पत्र्याची घरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. कुडाची अतिशय सामान्य अशी घरे मोठय़ा प्रमाणावर आहेत आणि स्वच्छ पिण्याजोगे पाणी, वीज, टॉयलेट्स इ. जगण्याच्या मूलभूत सोयीसुविधांपासून अनेक-जण वंचित आहेत, हे कटू वास्तवच आहे. जांभूळपाडा, नारळीपाडा येथे बस जाऊ शकत नाही. शेवटच्या स्टॉपपासून नारळीपाडापर्यंत जाण्यासाठी बरेच अंतर चालत जावे लागते. (नाही तर स्वत:चे वाहन हवे). सध्या पावसाळ्यात येथे जाताना वाट काढत जावे लागते. जाताना उजव्या बाजूला पाण्याचा मोठा प्रवाह (की मोठा नाला म्हणावे) वाहताना दिसतो. जो मुसळधार पाऊस पडल्यावर दुथडी भरून वाहू लागतो. या प्रवाहाच्या पलीकडे जंगलातून वाट काढत १० मी. चालत गेल्यावर आपण जांभूळपाडय़ावर जाऊ शकतो. पाऊलवाटा असल्याने चालत जाणे योग्य ठरते. कारण मोटरसायकलपण कशीबशीच जाते. त्यामुळे चारचाकी वाहनांचा प्रश्नच येत नाही. येथील काही घरांमध्ये अजून वीज पोहोचायची आहे हे ऐकल्यावर आपण चकित होतो. या सर्व प्रश्नांबरोबरच लहान मुलांच्या शिक्षणाचा, अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांचा, तरुणांच्या आर्थिक स्वावलंबनाचा (कायमस्वरूपी नोकरी/रोजगार) इ. अनेक गंभीर प्रश्न आहेत. पण काही सामाजिक संस्था, व्यक्ती येथील मुलांच्या शिक्षणाची गंभीर समस्या लक्षात घेऊन काम करीत आहेत. कारण खरोखरच हा गंभीर प्रश्न आहे आणि आला जर लहान मुलांसाठी सातत्याने परिश्रम घेतल्यास चित्र हळूहळू बदलू लागेल. अर्थात त्यासाठी चिकाटीने, सकारात्मक वृत्तीने आणि जीव ओतून काम करण्याची गरज आहे. कारण हा बदल, अपेक्षित यश हे काही काळाने मिळणार आहे, त्यासाठी वाट बघायला लागणार आहे हे समजून वाटचाल करायची आहे.विजय शिंदे, भालचंद्र किनरे आणि विवेक पवार हे आपापले नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक बांधिलकी जोपासू पाहणारे. काही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्य करण्याचे काम विजय शिंदे अनेक वर्ष करीत आहेत. विशेषत: येऊर परिसरात काम करीत असताना मुलांच्या शिक्षणाची समस्या, त्याची तीव्रता त्यांना प्रकर्षांने जाणवली. या मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर खरे तर इथे या मुलांना चांगले शिक्षण मिळणे, त्यांनी शिकण्याची गोडी निर्माण करणे, त्यांचे जगणे, त्यांची परिसर लक्षात घेऊन शिकवण्याचा आराखडा तयार करणे ही आदिवासी बांधवांच्या मुलांची खरी निकड आहे. विजय शिंदे यांनी इथे आठवडय़ातून दोन दिवस येण्याचे ठरवले. जांभूळपाडा येथे तीन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यापूर्वी तेथील मुलांच्या पालकांशी संवाद साधला आणि मग शनिवारी, रविवारी प्रत्येकी २ तास जायला सुरुवात केली. बरीचशी मुले शाळेत जात असली तरी शिकण्यापासून शिकवलेले समजण्यापासून ती खूप लांब आहेत. पालकही शिकण्यापासून लांब आणि जगण्याला सामोरे जाणे क्रमप्राप्त, त्यामुळे घरी पोषक वातावरणाचा पूर्णत: अभाव. या मुलांना झाडावर चढायला, पेरू, आवळे तोडायला, पाण्यात डुंबायला, पाण्यातील मासे पकडायला, डोंगरावर जाऊन खेकडे पकडायला खूप आवडते. त्यामुळे या हुंदडण्यापासून त्यांना संस्कार (आणि शिकवणी) वर्गाकडे वळवायचे ही पहिली पायरी होती. आधी त्यांच्याशी संवाद, गप्पा, गाणी, गोष्टी, छोटे खेळ, सोपे व्यायाम या मार्गाने जवळीक निर्माण केली गेली. पालकांचाही विश्वास संपादन केला जाऊ लागला. दर आठवडय़ाला घरोघरी जाऊन मुलांना बोलवावे लागे, पण अल्पावधीतच विजय शिंदे दिसू लागले की मुले येऊ लागली. या कामात मग भालचंद्र किनरे आणि विवेक पवार हेही सहभागी झाले. मग हळूहळू छोटी स्तोत्रे, श्लोक अशा टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू झाला. पण जांभूळपाडय़ापेक्षा नारळीपाडय़ांच्या मुलांचा उत्साह, शिकण्याकडे कल जास्त दिसून येत होता. पण त्या मुलांना जंगलातून जांभूळपाडय़ावर पाठवायला पालकांना धास्ती वाटत असे. ५-६ महिन्यांनी मग पालकांच्या विनंतीवरून नारळीपाडय़ावर एका पडवीत, निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात शिकवणीवर्ग सुरू झाला. गेली अडीच वर्षे येथील शिशू गटापासून अगदी दहावीपर्यंतची सर्वच मुले या वर्गात सहभागी होतात. शनि. ३ ते ५ आणि रवि. १० ते १२ या वेळेत हा उपक्रम राबवला जातो. मौखिक प्रसिद्धीच्या बळावर आतापर्यंत २५ ते ३० ठाणेकरांनी आपले योगदान देऊ केले आहे. मग या व्यक्ती काही दिवस येऊन मुलांना गाणी, गोष्टी, श्लोक, चित्रकला, हस्तकला किंवा अभ्यासाच्या विषयांचेही मार्गदर्शन करतात.येथील मुले शाळेत जात असली तरी (अगदी इ. ५वीत ६वीत असली तरी) बहुसंख्य मुलांना अक्षर किंवा अंक यांची हवी तशी ओळख नाही. काही मुले स्मरणशक्तीच्या बळावर अंक किंवा पाढे काढतातही, पण त्याचा अर्थ अजिबात कळत नाही. त्यामुळे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, ऱ्हस्व, दीर्घ या गोष्टींचा तर विचारच करता येणार नाही. यावरून मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात येईल. त्यामुळे या मुलांना समजून घेऊन त्यांचे जगणे लक्षात घेऊन, त्यांच्या पातळीवर जाऊन काम करावे लागते. ही मुले खूप हुशार आहेत, पण त्यांना योग्य आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची गरज आहे. कारण त्यांना गणित कळत नाही, पण सुट्टीत आंबे विकतात तेव्हा मात्र हिशेब चुकत नाही. यावरून तल्लख बुद्धी आहे, क्षमता आहे, पण मार्गदर्शन हवे आहे ते सिद्ध होते. या मुलांसाठी पाटी, पेन्सिल, अंकलपी अशा साहित्याचे सेट तयार करण्यात आले आहेत. साधारणपणे तिघे-चौघे स्वयंसेवक वर्गानुसार (इ.२, ३, ४थी) एकत्र घेऊन बसतात आणि त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करतात. मग मधून मधून लॅपटॉपवर त्यांना त्यांच्या शिकण्यासाठी पूरक म्हणून काही फिल्मस्, स्लाइड शो असाही अनुभव दिला जातो. काही वेळा त्यांना चिक्की, राजगिरा लाडू असा पौष्टिक खाऊ दिला जातो. वर्षांतून एकदा विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करून त्यांना त्या वेळी औषधेही पुरविली जातात. या पाडय़ावरील मुलांनी एकदा मुसळधार पावसामुळे या सरांना जायला थोडा उशीर झाला तर तुम्ही येणार आहात ना? असा फोन केला तेव्हा ती गोष्या या त्रिकुटाला खूप काही देऊन जाणारी ठरली. इथे खूप काम करायची गरज आहे, सहकार्य करू पाहणाऱ्या अनेक हातांची गरज आहे.