सामाजिक कार्यकर्त्यांच्या शोधमोहिमेला अखेर यश; सहा वर्षांनंतर घराला वारस मिळाला

सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी कुटुंबाला हक्काचे घर मिळाले. मात्र या कुटुंबप्रमुख आणि त्याच्या पत्नीचे निधन झाल्याने या घराचे काय करायचे, असा प्रश्न समोर आला. या कुटुंबप्रमुखाची एक मुलगी आपल्या मानलेल्या मामाकडे राहत असल्याची माहिती मिळाली आणि या सामाजिक कार्यकत्याकडून या मुलीचा शोध सुरू झाला. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या आदिवासी मुलीचे शोधकार्य संपले. आता या मुलीला तिच्या वडिलांना मिळालेले महापालिकेचे घर सुपूर्द करण्यात येणार आहे.. ही कहाणी आहे, वैशाली वाघे या मुलीची.

मीरा-भाईंदर महापालिकेचे सध्याचे मुख्यालय उभे असलेल्या जागी आधी एक तलाव होता. या तलावाच्या काठी काही आदिवासींची घरे होती. त्यात प्रकाश वाघे यांचेही घर होते. २०००मध्ये तलावाच्या जागी मुख्यालयाचे काम सुरू झाल्यानंतर इथल्या आदिवासांना सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ असलेल्या आंबेडकर नगरात आणि त्यानंतर काही दिवसांनी मीरा रोडच्या महापौर निवासासमोर असलेल्या शासकीय भूखंडावर विस्थापित करण्यात आले. याच दरम्यान प्रकाश वाघे याची पत्नी मंजुळा हिचे २००८ मध्ये निधन झाल्याने प्रकाश यांनी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या वैशालीला तिच्या मानलेल्या मामाकडे सांभाळ करण्यासाठी पाठवले.

या आदिवासींची कधी इथे तर कधी तिथे अशी सुरू असलेली फरफट सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांना सलत होती. महापालिकेच्या प्रकल्पात विस्थापित झाले असल्याने या आदिवासींना हक्काचे घर मिळाले पाहिजे या ध्यासाने सुवर्णा यांना पछाडले आणि अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेच्या बेघरांसाठी असलेल्या प्रकल्पातून या आदिवासींना घर मिळवून दिले. प्रकाश वाघे यांनाही या प्रकल्पातून घर मिळाले. दुर्दैवाने वाघे यांचेही २०११ मध्ये निधन झाले. वाघे यांचे घर बंद असल्याने ते घर ताब्यात घेण्यासाठी महापालिका स्तरावर हालचाली सुरू झाल्या. खरे तर या घरावर प्रकाश वाघे यांच्या मुलीचा, वैशालीचा हक्क होता, परंतु तिचा ठावठिकाणा माहिती नसल्याने सुवर्णा यांना काहीच हालचाल करणे शक्य होत नव्हते, परंतु वैशालीचा शोध घ्यायचा आणि तिला तिचे हक्काचे घर मिळवून द्यायचा निर्णय सुवर्णा यांनी घेतला आणि मग सुरू झाला वैशालीचा शोध. सर्वात आधी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही काळ थांबण्याची विनंती केली. वैशाली आपल्या मानलेल्या मामाकडे आहे इतकीच जुजबी माहिती त्यांच्याकडे होती.

वाघे यांची पत्नी मूळची पनवेल येथील चिंचवण येथील राहणारी असल्याचे सुवर्णा यांनी शोधून काढले. चिंचवणला जाऊन वैशालीला घेऊन यायचे त्यांनी ठरवले आणि रविवारी पहाटेच त्यांनी भाईंदर सोडले आणि सोबत काही आदिवासींना घेऊन चिंचवण गाठले, परंतु त्याठिकाणी वैशाली सापडली नाही. त्यामुळे कोंडवळ आणि नंतर बारापाडा अशी भ्रमंती केल्यानंतर मात्र वैशाली पेणजवळील सावरसाई गावी असल्याचे त्यांना समजले.

सुवर्णा सोमवारी सकाळी सावरसाईमध्ये पोहोचले. त्याठिकाणीच्या एका खासगी  प्राथमिक शाळेत त्यांना वैशालीच्या नावाची नोंदणी सापडली, परंतु वैशालीचे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याने तिने शाळा सोडली, मात्र शाळेत सुवर्णा यांना जवळच असलेल्या कातकरी पाडय़ावर शोध घेण्यास सांगण्यात आले. न कंटाळता सुवर्णा कातकरी पाडय़ावर पोहोचले. त्याठिकाणी वैशाली आपल्या पती आणि एका मुलीसह राहत होती. सोबत असलेल्या आदिवासी महिलांनी वैशालीच्या चेहऱ्यावर असलेल्या खुणांवरून तिची ओळख पटवली, शिवाय वैशालीकडे आई-वडिलांचे छायाचित्रही मिळाले. अशा प्रकारे रविवारी पहाटेपासून सुरू झालेला वैशालीचा शोध सोमवारी दुपारी संपुष्टात आला.

वैशालीकडे असलेली सर्व कागदपत्रे सुवर्णा यांनी गोळा केली आणि ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सुपूर्द केली. आता लवकरच तिच्या वडिलांच्या नावावर असलेले घर वैशालीच्या नावावर होणार आहे.