वरप गावातील आदिवासींचा रस्ता राधास्वामी आश्रमाकडून बंद

कल्याण तालुक्यातील वरप गावातील वर्षांनुवर्षांचा वहिवाटीचा रस्ता राधास्वामी सत्संग न्यास (पंजाब) संस्थेने कुंपण घालून, पत्रे लावून बंद केला आहे. त्यामुळे वरप ग्रामस्थ, परिसरातील आदिवासी पाडय़ावरील रहिवाशांना तीन किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागते. सत्संगने बंद केलेला रस्ता तातडीने सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी वरप ग्रामस्थ, या भागातील आदिवासींनी कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

रस्ता बंद केल्यामुळे वरप परिसरातील रहिवाशांना झाडा-झुडपांमधून वळसा घेऊन किंवा म्हारळ मार्गे घरचा रस्ता गाठावा लागतो. वर्षांनुवर्षे वरप गावाचे रहिवासी राधास्वामी सत्संगच्या जागेतून आपल्या घरी जात असत. या भागातून शेतकऱ्यांची, गाईगुरांची ये-जा असे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता वरप गावाकडे जाणारा रस्ता सत्संगकडून बंद करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांची कोंडी झाली आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

राधास्वामी आश्रमाच्या बाजुला वन विभागाची जमीन आहे. या जमिनीचा काही भाग पत्रे लावून सत्संग व्यवस्थापनाकडून बंद करण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेत वरप परिसरातील गाईगुरे पावसाळ्यात चरण्यासाठी नेण्यात येतात. पत्रे लावल्यामुळे तेथील चराऊ कुरण बंद झाले असून वन विभागही याविषयी कोणती कृती करीत नसल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सत्संगच्या पदाधिकाऱ्यांचे शासनदरबारी वजन असल्यामुळे या बंद रस्त्याची शासनदरबारी दखल घेण्यात येत नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. वरप ग्रामपंचायतीने एक ठराव करून वरप आदिवासी वाडीकडे जाणारा राधास्वामी सत्संगने बांधलेला रस्ता तातडीने खुला करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

वरप ग्रामपंचायत हद्दीतून जाणारा हा रस्ता अनेक वर्षे रहिवाशांच्या वहिवाटीचा मार्ग होता. अचानक हा रस्ता सत्संगकडून अनधिकृतपणे बंद करण्यात आला आहे, असे ठरावात म्हटले आहे.

सत्संगने बंद केलेला रस्ता खुला करण्यात आला नाहीतर आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सत्संगने त्यांच्या जमिनीची मोजणी केली. त्यांची जमिनीची हद्द निश्चित करून ती बंदिस्त केली. त्यात रस्त्याचा भाग आला. रस्ता बंदचे प्रकरण हे आठ वर्षांपूर्वीच नस्तीबंद करण्यात आले होते. आता हे प्रकरण पुन्हा बाहेर आले आहे.  या प्रकरणी सुनावणी घेऊन निर्णय होईल.   – अमित सानप, तहसीलदार, कल्याण</strong>