पारंपरिक नृत्य, गायनातून व्यथा मांडल्या; मुलभूत समस्यांवरही लक्ष वेधले
प्रकाश नगर भागात झालेल्या आदिवासींच्या झोपडपट्टीवरील कारवाईच्या निषेधार्थ आणि प्राथमिक सुविधांच्या मागणीसाठी शेकडो आदिवासींनी सोमवारी अंबरनाथ तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला. श्रमजीवी संघटनेने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठय़ा संख्येने उपस्थित आदिवासींनी आपल्या पारंपरिक नृत्य आणि गायन कला सादर करत आपल्या मागण्या मांडल्या.
चौथी मुंबई म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील बराचसा भाग विकसित झाला असला तरी आजही अनेक आदिवासी पाडे तालुक्यात अस्तित्वात आहेत. त्यातील अनेक ठिकाणचा रस्ते, पाणी, आरोग्य आणि घरांचा प्रश्न आजही सोडविण्यात आलेला नाही. स्वातंत्र्यानंतरही अशा प्राथमिक सुविधांपासून हे पाडे वंचित आहेत. असे असताना आता आदिवासींच्या हक्काच्या जमिनीवरही प्रकल्प राबवून शासन त्यांना बेघर करणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
प्रकाश नगरमधील आदिवासींच्या झोपडय़ा अधिकृत करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, चिखलोली, ठाकूरपाडा, कातकरीपाडा, वडवली चंदनवाडी, करवले या पाडय़ांवरील प्रस्तावित प्रकल्प थांबवून आदिवासींचे विस्थापन रोखावे, प्राथमिक सुविधांसह पाण्याचा प्रश्नही सोडवावा, अशा मागण्या या वेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. शासनाकडून आदिवासींना मिळणाऱ्या सुविधा सुरळीतपणे मिळाव्यात, अशीही मागणी या वेळी आदिवासींनी केली. आपल्या पारंपरिक कलांमधून आदिवासी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडत होते.