शाळेबरोबरच रुग्णसेवा केंद्राचीही सुविधा; जव्हारच्या वाळवंडे गावातील आदर्श प्रकल्प 

मुंबई-ठाणे परिसरातील नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून केलेल्या मदतीचा वापर करून जव्हार तालुक्यातील वाळवंडे या दुर्गम आदिवासी गावात गेल्या दोन दशकांत चांगल्या दर्जाची शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. वाडा येथील माऊली शिक्षण प्रसारक मंडळाने १८ वर्षांपूर्वी वाळवंडे गावातील एका कुक्कुटपालनाच्या खुराडय़ात शाळेचे वर्ग भरविण्यास सुरुवात केली. पुढे ठाणे-पालघर भागात शैक्षणिक कार्य करणाऱ्या ग्राममंगल संस्थेचे राम देवळे आणि सहकाऱ्यांनी शाळेचे हे रोपटे वाढविले. त्यासाठी मुंबई-ठाण्यातील मित्रांची मदत घेतली. माऊली शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन आणि देवळे कुटुंबीय तसेच मित्र परिवाराकडून वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या मदतीतून आता वाळवंडे गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असणारी उत्तम दर्जाची शाळा आणि स्थानिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा दवाखाना कार्यान्वित झाला आहे. वर्षांनुवर्षे अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या आदिवासींना ज्ञानाचा प्रकाश दाखविण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. आता या कार्याची व्याप्ती अधिक वाढवत भविष्यात इथे कनिष्ठ महाविद्यालय आणि परिचारिका प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे.

शासनाकडून कायम विनाअनुदानित या अटीवर मंजुरी मिळालेल्या वाळवंडे गावातील या शाळेमुळे परिसरातील ३५ किलोमीटर परिघातील गावांमधील मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणाची सोय झाली आहे. सध्या शाळेची सुसज्ज इमारत असून, त्यात ३२५ मुले-मुली शिकतात. शाळा नव्हती, तेव्हा या परिसरातील क्वचितच एखादा मुलगा दहावीपर्यंत शिकत असे. शिक्षण अर्धवट सोडून ते आई-वडिलांसारखे मजुरी करीत. मुलींचे लहान वयात लग्न लावून दिले जाई. आता गेली चार वर्षे शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागत आहे. शाळेत मुलांना विनामूल्य शिक्षण, शैक्षणिक साहित्य, माध्यान्ह्य़ भोजन दिले जाते. दूर राहणारी मुले-मुली शाळेच्या वसतिगृहात राहतात. सध्या प्रत्येकी २५ मुले- मुली वसतिगृहात राहतात. राज्यातील इतर भागांप्रमाणेच या आदिवासी भागातही शिक्षणात मुली मुलांच्या पुढे आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच मर्यादित राहू नये म्हणून लवकरच इथे कनिष्ठ महाविद्यालय आणि परिचारिका प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विलास गोळे यांनी दिली.

शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागते. गेल्या दोन दशकांत दुर्गम आदिवासी भागात शिक्षण प्रसाराचे काम करणाऱ्या या संस्थेला शासनाने अनुदान द्यावे. त्यामुळे संस्था अधिक सक्षमपणे काम करू शकेल, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.

रुग्णसेवा केंद्र

शिक्षणाबरोबरच या परिसरातील आरोग्याचा प्रश्नही गंभीर होता. वाळवंडे गावापासून जव्हार १४ किलोमीटर तर वाडा ३५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे देवळे कुटुंबीयांनी परिचित डॉक्टरांच्या मदतीने इथे २००७ पासून स्वामी विवेकानंद धर्मदाय दवाखाना सुरू केला. सुरुवातीला ही सेवा एका दिवसापुरती मर्यादित होती. हळूहळू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आठवडय़ातून दोन, तीन आणि नंतर इथे कायम रुग्ण सेवा केंद्र सुरू झाले. इथे रुग्णांना विनामूल्य औषधे दिली जातात. सध्या दरदिवशी सरासरी पन्नास ते साठ रुग्ण दवाखान्यात येतात. पावसाळ्यात रुग्णांची संख्या दुप्पट होते, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मोरे यांनी दिली. मुंबईतील साऊली ट्रस्ट गेल्या दोन वर्षांपासून दवाखान्याचे व्यवस्थापन पाहात आहे.

दुर्गम आणि आदिवासी भागात गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांची कायम विनाअनुदानीत ही अट शासनाने शिथील करून त्यांना अनुदान द्यावे. अथवा ‘सीएसआर’च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून त्यांच्या गरजा भागवाव्यात. वाळवंडे गावातील शाळा त्याचे उत्तम उदाहरण असून अशा उपक्रमांच्या पाठीशी उभे राहून शासनाला व्यापक सामाजिक हित साधणे शक्य आहे.         – रमेश पानसे, शिक्षणतज्ज्ञ.