विविध संस्थांच्या प्रयत्नांना यश; येऊरच्या पाडय़ावरील विद्यार्थ्यांचे विनामूल्य शिक्षण

मराठी शाळांमधील पटसंख्या रोडावू लागल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरातील शाळा व्यवस्थापनांनी गरीब, गरजू, अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे दरवाजे खुले करत मराठी वर्ग सुरू राहतील यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसू लागले आहे. मराठी शाळांना सरकारकडून मोठय़ा प्रमाणावर अनुदान दिले जाते. मराठी वर्ग बंद पडले तर अनुदानही हातचे जाईल, अशी चिंता अनेक शाळा व्यवस्थापनांना सतावू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर मराठी वर्ग सुरू राहण्यासाठी शिक्षण संस्थांनी विविध समाजपयोगी उपक्रम हाती घेतले असून आदिवासी पाडे, आश्रमशाळा, झोपडय़ांमधील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा मार्ग यामुळे खुला झाला आहे.

मराठी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होत असल्याने अनेक मराठी शिक्षण संस्थांना आतापासूनच भविष्याची चिंता सतावू लागली आहे. ठाण्यातील काही नामवंत मराठी शिक्षण संस्थांनी काळाची पावले ओळखून इंग्रजी शाळा सुरू केल्या. काही संस्थांच्या जागा शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे शाळांची पुनर्बाधणी करत खासगीकरणाद्वारे त्यातून महसूल उभा करण्याचे प्रयत्नही नौपाडा तसेच आसपास असलेल्या काही शिक्षण संस्था करताना दिसत आहे. असे असले तरी आहेत त्या मराठी शाळा टिकाव्यात यासाठी काही संस्थांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

वर्तकनगर येथील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या काही वर्षांपासून येऊरमधील आदिवासी पाडय़ावरील अनाथआश्रमातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी शाळेतील शिक्षक आणि माजी विद्यार्थी पुढाकार घेताना दिसत आहेत. येऊरमधील आदिवासी पाडय़ावरून मुलांना शाळेत आणण्यासाठी तसेच आश्रमाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी खास वाहनाची सुविधा देण्यात आली आहे. सध्या ६ ते १८ वयोगटातील अनाथाश्रमातील ६० मुले या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ठाणे शहराबरोबरच अंबरनाथ, बदलापूर येथील शाळांमध्ये असाच उपक्रम राबवण्यात येत असून मराठी शाळांच्या पटसंख्या वाढवण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे काही संस्थाचालकांकडून सांगण्यात येत आहे.

अंबरनाथ येथील ठाकूरपाडा आदिवासी पाडय़ावरील २५ विद्यार्थी सध्या श्रीमती सुशीलाताई दामले या शाळेत मोफत शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक खर्च माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अनाथाश्रमातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेत मोफत शिक्षण दिले जात असले तरी या मुलांच्या प्रवेशामुळे मराठी शाळेची पटसंख्या वाढण्यास निश्चितच सहकार्य होत आहे, असे अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी विनायक पटवर्धन यांनी सांगितले. तसेच अंबरनाथच्या भगिनी मंडळ शाळेच्या माध्यमातून धनगरवाडी या आदिवासी पाडय़ावरील मराठी शाळेत विद्यार्थ्यांना ई-लर्निगसाठी डिजिटल स्क्रीन पुरवण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणासाठी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे संस्थेच्या संचालिका डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांनी सांगितले.

शाळा टिकवण्यासाठी सीएसआरचा आधार

शाळेविषयी असलेल्या आपुलकीतून मराठी शाळा टिकण्यासाठी काही माजी विद्यार्थ्यांकडून सीएसआर फंडाचा उपयोग केला जात आहे. माजी विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनाच्या समन्वयातून शाळेतील दैनंदिन सुविधांसाठी याचा उपयोग करण्यात येत आहे. मराठी शाळेची पटसंख्या कमी होण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांचा अभाव हे कारण असल्यामुळे अंबरनाथच्या शाळेत सीएसआर फंडातून पाणी शुद्धिकरण यंत्र घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहांची बांधणी करण्यात येत आहे, असे विनायक पटवर्धन यांनी सांगितले.

शाळेतील इतर विद्यार्थ्यांबरोबर येऊरच्या आदिवासी पाडय़ावरील आश्रमातील मुलांना शिक्षण देण्यात येत असल्याने त्यांचा सर्वागीण विकास होतो. खेळ, पोषण आहार शाळेत उपलब्ध होतो. इंग्रजी संभाषण कौशल्याचे वर्ग या मुलांसाठी आयोजित केले जात आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित साहाय्यातून होतो.    – केदार जोशी, ब्राह्मण शिक्षण मंडळ, ठाणे