|| जयेश सामंत

ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील चुकीची गणिते अंगलट : – शहरी पक्ष अशी ओळख मिरवत ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेला आगामी काळात शहरी भागात अस्तित्व राखताना मोठय़ा आव्हानांचा सामना करावा लागेल, असेच चित्र गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांनंतर पुढे येऊ लागले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात इतर पक्षांची वाढलेली ताकद तसेच नवी मुंबई, भिवंडी, मीरा-भाईदर यासारख्या शहरी पट्टय़ात मांडलेली चुकीची गणिते यामुळे शिवसेनेला आगामी काळ सोपा राहिलेला नाही, असे एकंदर वातावरण आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या चार जागांवर शिवसेनेला यंदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. यापैकी शहापूर विधानसभा मतदारसंघातील पराभव तर शिवसेनेने अक्षरश ओढवून घेतला. हा अपवाद वगळला तर ग्रामीण पट्टय़ात शिवसेनेची कामगिरी तशी बरी राहिली. शहरी भागातही शिवसेनेच्या मतांची संख्या मोठी असली, तरी प्रमुख महापालिकांच्या क्षेत्रात आमदारांची संख्या वाढविण्यात पक्षाला यश आले नसल्याने चिंता वाढल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, भिवंडी पूर्व आणि अंबरनाथ या शहरी पट्टय़ात मोठा विजय मिळवला होता. याशिवाय युती नसल्याने कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रात शिवसेनेने भाजपला तोडीस तोड आव्हान उभे केले होते. त्याचा परिणाम म्हणून या सगळ्या पट्टय़ात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ वाढलेले दिसले. यावेळी मात्र शिवसेनेला भिवंडी पूर्वची जागा गमवावी लागली. शिवाय युती असूनही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आमदारांची संख्या वाढविता आली नाही.

युतीच्या जागा वाटपात शिवसेनेने कल्याण पश्चिमेची जागा पदरात पाडून घेताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर आणि ऐरोली या जागांवर पाणी सोडले. या ठिकाणी सहा महिन्यांत महापालिका निवडणुका असून युती झाली नाही तर दोन्ही मतदारसंघांत असलेल्या भाजप आमदारांचा सामना कसा करायचा, असा प्रश्न स्थानिक नगरसेवकांना पडला आहे. त्यामुळे पक्षाचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी भाजप नेत्यांच्या आतापासूनच संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. मीरा-भाईदर पट्टय़ात शिवसेनेने अपक्ष उमेदवार गीता जैन यांना साथ दिली असली, तरी येथेही भविष्यात शिवसेनेला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.

कोठे, काय चुकले?

  •  ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे शहर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी असा शिवसैनिकांचा आग्रह होता. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणचा आग्रह धरला. याचा परिणाम म्हणून भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना शिवसेनेच्या असहकाराचा फटका सहन करावा लागला. मनसेचा एकही नगरसेवक नसताना येथे पक्षाच्या उमेदवाराला ७१ हजार मते मिळाली.
  • कळवा-मुंब्रा मतदारसंघात महापालिकेच्या ३० पेक्षा अधिक जागा आहेत. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड निवडून येणार हे स्पष्ट होते. मात्र, ज्याचा पक्षाचा संबंध नाही असा उमेदवार देऊन शिवसेनेने स्वतच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे.
  •  भिवंडी महापालिका क्षेत्रात रुपेश म्हात्रे यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार होता. येथे म्हात्रे यांच्या विरोधात यंदा कमालीची नाराजी होती. मात्र शिंदे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली. ही जागा पडल्याने भिवंडी भागात भाजप अधिक सक्रिय होईल असे चित्र आहे.
  • कल्याण ग्रामीण क्षेत्रातील दिवा आणि डोंबिवलीतील आठ प्रभागांच्या शहरी पट्टय़ात आता मनसे अधिक सक्रिय होईल असे चित्र आहे. दिवा भागात मनसेला चांगली मते मिळाली. या ठिकाणी महापालिकेच्या आठ जागा आहेत. त्या राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेला आगामी काळात पेलावे लागणार आहे.