tvlog03पावसाळ्यात शहापूर तालुक्याला एक वेगळाच बहर येतो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या तालुक्यातील विविध ठिकाणी वर्षांपर्यटन करण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप वळतात. तानसा अभयारण्य, भातसा-तानसा धरण परिसर, माहुली किल्ला आदी ठिकाणे तर पर्यटकांची खास आकर्षणे. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी तर धो धो कोसळणारे धबधबे आणि निसर्गाने नटलेला हा परिसर पाहताक्षणी प्रेमात पडावे असा.. वळणवाटा, झोंबणारा गार वारा, हिरवाईने नटलेला डोंगर आणि त्यातून निघणारे दुधाळ निर्झर यामुळे पर्यटकांना जणू स्वर्गसौंदर्याचा भास होतो.
शहापूरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर पर्यटकांना मनमुराद आनंद देतो. माहुली गावापासून २० ते २५ मिनिटांचा प्रवास माहुली धबधब्यापर्यंत नेऊन पोहोचवतो. मात्र या प्रवासाचे वर्णन शब्दात करणे कठीण. हिरवाई नटलेल्या या परिसरात पाऊसधारा झेलत पायवाटेने होणारा हा प्रवास मनाला खूप सुखावून टाकतो. माहुली किल्ला हा तर शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार. हा किल्ला, डोंगरमाथा, घनदाट झाडी न्याहळत डोंगरकडय़ावरून कोसळणाऱ्या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घ्यायला एक वेगळीच मजा आहे. या परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे आहेत, त्याचा भिजण्याचा आनंद पर्यटक घेतातच, पण मुख्य धबधब्यात चिंब होण्यात एक वेगळीच मजा आहे. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर उंचावरून धो धो पडणारे पाणी पाहताना त्यात भिजल्याशिवाय राहवत नाही. धबधब्याच्या जवळ जाणारी वाट जरा अवघड व निसरडी असल्याने तिथे जाताना काळजी घेतलेली बरी. हा धबधबा उंचावरून कोसळत असल्याने आणि येथे अपघात होण्याची शक्यता आहे. पण धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कोसळणारे पाणी अंगावर झेलणे एका वेगळ्याच मजेचा अनुभव देते.
डोंगराच्या कडावरून फेसाळत कोसळणारा हा दूधसागर पाहून मन अचंबित होते. या धबधब्याचे जलतुषार अंगावर घेताना एक वेगळीच मजा येते. धबधब्याच्या खालच्या बाजूस पाण्याचा डोह तयार झालेला आहे, काही साहसी तरुण या डोहापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पण केवळ मौजमजा करण्यासाठी आलेल्यांनी तिथे न जाणेच बरे.
तानसा अभयारण्याच्या परिसरात येणाऱ्या या परिसरात अनेक जीवसृष्टीही पाहायला मिळते. हा परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. अनेक महत्त्वाच्या व दुर्मीळ वनस्पती येथे आढळतील. विविध प्रकारचे वृक्ष, घनदाट जंगल न्याहळताना आपल्याला वनसफारीचाही आनंद घेता येतो. एकूणचा हा परिसर म्हणजे निसर्गसौंदर्याचे लेणे आहे.

कसे जाल?
माहुली धबधबा, शहापूर
* मध्य रेल्वेवरील आसनगाव स्थानकावर उतरावे. तेथून माहुली गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. मात्र रिक्षाचे भाडे आधीच ठरवून घ्या.
* आसनगाव व शहापूरपासून एसटी बस माहुलीपर्यंत जातात.
* मुंबई-नाशिक महामार्गावरून खासगी वाहनानेही जाता येईल.

ही काळजी घ्या..
* हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे वाट चुकण्याची आणि अनावश्यक भटकंती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची मदत घ्या.
* धबधब्यापर्यंत जाणारी वाट निसरडी असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
* धबधब्याच्या मध्ये अधिक काळ थांबण्याचा प्रयत्न करू नका ते धोकादायक आहे. वरून दगड-गोटे कोसळण्याची भीती आहे.
* निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या रमणीय पर्यटनस्थळाचे सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येथे धिंगाणा करणे आणि निसर्गास बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नका.