सर्वेक्षणानंतर निर्णय; नगराध्यक्षांची माहिती
ठाण्याच्या धर्तीवर बदलापुरात रेल्वे स्थानकावर वाढीव फलाट तयार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची तयारी दाखवली आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या फलाट क्रमांक एकला लागूनच ‘होम प्लॅटफॉर्म’ उभारता येईल का? याची चाचपणी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. रेल्वे स्थानकावर पडणारा प्रवाशांचा ताण कमी व्हावा यासाठी हा विचार पुढे आला आहे. या वाढीव फलाटाची उभारणी कशा प्रकारे करता येईल यासंबंधीचे सर्वेक्षण करण्याची तयारी नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली.
बदलापूर रेल्वे स्थानकावर वाढत्या लोकसंख्येचा प्रचंड ताण पडतो आहे. त्यात फलाट क्रमांक एक आणि दोन हे सर्वाधिक गर्दीचे आहेत. कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ा येथे थांबतात. तसेच फलाट क्रमांक एकवर मुंबईहून येणाऱ्या लोकल गाडय़ा आणि मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या लोकलही थांबतात. गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराचे नागरीकरण झपाटय़ाने होत असून लोकसंख्यावाढीचा वेगही मोठा आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात फलाटांच्या उपलब्धतेचा आतापासूनच विचार व्हायला हवा असा मुद्दा प्रवाशी संघटनांमार्फत सातत्याने पुढे आणला जात आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेले अरुंद फलाट आणि अपुऱ्या जिन्यांमुळे स्थानकात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांचा त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर पर्याय म्हणून होम प्लॅटफॉर्मची संकल्पना पुढे आली आहे.
याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर स्थानिक रेल्वे प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाला पाठवला. नव्या फलाटाची उभारणी करायची झाल्यास कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या ताब्यातील स्थानकालगतची जमीन त्यासाठी लागणार आहे. रेल्वेने यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. बदलापूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आला होता. बदलापूर पश्चिमेतील पोलीस चौकी ते स्कायवॉकखाली असलेल्या रिक्षा थांब्यापर्यंतची जागा यासाठी आवश्यक आहे. त्या जागेबाबत सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच रेल्वे आणि पालिका या विषयावर चर्चा करून प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य निर्णय घेईल, असे यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी जाहीर केले. रेल्वे स्थानकात नव्या फलाटाची उभारणी व्हावी यासाठी एकत्रित प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताची दखल
लोकसत्ताने याबाबत ३१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर स्कायवॉकवरील तिकीट खिडकीच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार कपील पाटील यांनीही याविषयी सकारात्मक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा करण्यात आली.