महावीर जंगटे ,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे
ठाण्यातील मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तीन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते. येथील शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने शेती करता यावी, त्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत, शेतीसाठीचे पीक कर्ज आणि विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी ठाणे जिल्हा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील शेतमाल परदेशात निर्यात करताना मध्यस्थाचा अडसर दूर करून शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाचे ठाणे जिल्हा अधीक्षक महावीर जंगटे यांच्याशी साधलेला संवाद..

* ठाण्यातील शेतीची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे?
ठाणे शहरातील ६ तालुक्यांपैकी सर्वाधिक ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तीन तालुक्यांमध्ये शेती केली जाते. खरीप हंगामामध्ये भाताचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. गेल्या वर्षी वेगवेगळ्या ११ जातींचे सुमारे ८ हजार ६६९ क्िंवटल भाताच्या बियाणांचे वाटप करण्यात आले होते. यंदा सुमारे ११ हजार ५९७ क्विंटल भाताच्या बियाणांचे वाटप केले जाणार आहे. भात पिकाबरोबरच भाजीपाला लागवडीसाठीसुद्धा कृषी विभाग प्रोत्साहन देते. खरिप हंगामात दोडका, कार्ली, घोसाळी यांचे उत्पादन घेतले जाते तर रब्बीमध्ये भेंडी, मिरची, शिमला मिरचीसारख्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. भाज्यांबरोबरच कडधान्याकडे शेतकऱ्यांचा ओढा असून वाल या पिकाची मोठी लागवड होते. याबरोबरच हरभरा आणि तुरीचे उत्पादन येथील शेतकरी घेतात. आंबा, काजूच्या फळबागाही मुरबाड आणि शहापूरमध्ये आहेत.
* ठाण्यातून कोणता शेतमाल परदेशात पाठवला जातो?
शहापुर तालुक्यातील भेंडी राज्यात आणि परदेशातसुद्धा पाठवली जात असून प्रामुख्याने दुबईमध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडून परदेशात विक्री करणाऱ्या मध्यस्थ कंपन्या असून त्यांच्या मार्फत ही विक्री केली जाते. भविष्यात शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या तयार करून त्यांच्याकडून थेट परदेशात विक्री करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. परदेशात विक्री करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या शेतमालाची गरज असून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले जात आहेत.
* ठाण्यात यांत्रिक शेती करण्याचे प्रमाण कसे आहे?
पारंपरिक पद्धतीने भातामध्ये चिखलणी केली जाते आणि त्यानंतर भाताची रोपे लावली जातात. त्यामुळे मुळांना जोर धरण्यास वेळ लागत असतो. हे टाळण्यासाठी चिखलणी न करताच रोप लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यांत्रिक पद्धतीने रोप लागवड केल्यामुळे हे शक्य होते. या भागात भात लावणीसाठी मजुरांची उपलब्धता होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. लावणी यंत्रणामुळे चार दिवसांमध्ये पूर्ण होणारे काम अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण होते. त्याबरोबरच रासायनिक पांढरा युरिया शंभर टक्के बंद करण्यात आला असून यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना निम कोटेड युरिया देण्यात येणार आहे. पूर्वी खत टाकल्यानंतर ते वाहून जायचे, मात्र निम कोटेड युरिया विरघळण्याचा वेग अत्यंत कमी असून तो मुळांजवळच राहतो. मुळांना आवश्यकतेनुसार खताचे गुण प्राप्त होतात. हा यंदाचा वेगळा बदल असल्याने त्याचा उत्पन्नावर चांगला प्रभाव पडेल.
* पावसाच्या अनियमिततेमुळे होणारे भातशेतीचे नुकसान टाळता येऊ शकते?
यंदाच्या वर्षी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान पीक विमा (फसल बिमा) योजनेची घोषणा झाली असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे शक्य झाले आहे. अतिवृष्टी किंवा पाऊस न पडल्याने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. तसेच पीक कर्जाची सोयसुद्धा उपलब्ध असून बँकांमधून कर्ज घ्यावे, कर्ज घेतलेल्यांचे विम्याचे हप्ते भरले जातात.
* भाताच्या वितरणासाठी कसे प्रयत्न केले जातात?
कृषी विभागाकडून ठाणे, डोंबिवली या शहरांमध्ये तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना तांदूळ खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महोत्सवात वाडा कोलमबरोबरच मुरबाज झिनी हा बारीक आणि वासाचा तांदूळ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच भिवंडीतील काही शेतकऱ्यांनी वाडा कोलमचेही उत्पादन घेतले होते. ग्राहक आणि शेतकऱ्यांचे कायमचे नाते या माध्यमातून तयार होऊ लागले आहे.
संकलन :- श्रीकांत सावंत