News Flash

लघुपटातून महिलांच्या वेदना मांडण्याचा तरुणीचा प्रयत्न

अत्याचारांना बळी पडलेल्या मुलींना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी कोणत्या बदलांची आवश्यकता आहे

| August 19, 2015 01:35 am

अत्याचारांना बळी पडलेल्या मुलींना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी कोणत्या बदलांची आवश्यकता आहे याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न डोंबिवलीतील श्रेया पाठक या तरुणीने एका लघुपटाद्वारे केला आहे. अशा पीडित मुलींसोबत समाजाचे वर्तन कसे असावे तसेच महिलांनीही आत्मबळ वाढविण्यासाठी नेमके काय करावे, याची चर्चाही या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
श्रेया पाठक-शेट्टी हिने एक राजहंस या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटाची मूळ संकल्पना लेखिका भारती मोरे यांची आहे. या कथेविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या समाजात वावरताना महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते, आरोपींना शिक्षा होते. मात्र पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहातो. पीडित मुलींचा फारसा विचार होताना दिसत नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर समाजात या घटनांचा निषेध नोंदिविला जात असून त्याविषयी जागृती होताना दिसते. मात्र त्या मुलीचे काय तिचा काही अपराध नसताना समाज तिलाच दोषी ठरवू लागतो. आपसूक त्या मुलीतही न्यूनगंडाची भावना निर्माण होते. समाजात तिला सन्मानाने जगता यावे यासाठी या घटनांवर आपण लिहिते झालो, असे मोरे यांनी स्पष्ट केले. ओंजळ या कथासंग्रहातील ही नाटिका असून पीडित मुलींना एक सन्मानाते स्थान देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्या सांगतात.
श्रेया पाठक या तरुणीने आतापर्यंत तीन लघुपटांची निर्मिती केली आहे. बॅचलर ऑफ बीझनेस अॅडमिनिस्ट्रेटसचे शिक्षण घेतल्यानंतर रेडिओ जॉकीचा कोर्स तिने केला. त्यानुसार त्या प्रोडक्शनमध्ये कामाला लागल्यावर या क्षेत्राशी तिचा जवळून संबंध आला. गेली चार वर्षे ती या क्षेत्रात कार्यरत असून याआधी तिने २ ते ३ चित्रपटांचे सहदिग्दर्शन केले आहे. त्यानंतर समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करण्यासाठी लघुपटासारखे उत्तम माध्यम नाही हे लक्षात आल्यावर श्रेयाने सर्वप्रथम एक्की हा स्त्री भ्रूणहत्येवर आधारित लघुपट बनविला. त्यानंतर दारुडय़ा या लघुपटाची निर्मिती केली आणि आता त्या एक राजहंस या लघुपटाच्या माध्यमातून बलात्कार पीडित तरुणींचे जीवन मांडत आहेत. बलात्कार झाल्यानंतर मनाने खचलेल्या एका तरुणीचा एक तरुण कशा प्रकारे स्वीकार करतो यावर एक राजहंस ही कथा आधारलेली आहे. या लघुपटाचे चित्रीकरण रायते, कल्याण, डोंबिवली निवासी भागात झालेले असून तीन दिवसात ते पूर्ण केले आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो दाखविला जाणार आहे. यात डॉ. विलास उजवणे, प्रशांत पाटील, प्राजक्ता यादव यांनी भूमिका साकारल्या असून निर्माते सुप्रिया पाठक, श्रीपाद पाठक, प्रशांत सागवेकर, हरिप्रसाद शेट्टी हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 1:35 am

Web Title: trying to express the pain of women
Next Stories
1 बनावट शस्त्र विक्री प्रकरणी आणखी तिघांना अटक
2 येऊरच्या मद्यपानाला ‘हरित गटारी’चा लगाम
3 उत्सवकाळातील रस्ते खोदकामाला चाप
Just Now!
X