शिवसेनेच्या नगरसेवकांना नेत्यांचा इशारा

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी जंगजंग पछाडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा मुंढेंबाबतचा आकस अजूनही कमी झालेला नाही. नवी मुंबईतील नगरसेवकांनी मंजूर केलेला अविश्वास ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळल्यानंतरही शिवसेनेने मुंढे यांच्याविरोधातील कारवाया सुरूच ठेवल्या असून आता तर मुंढेंच्या कामाचे कौतुक करणाऱ्या पक्षातील नगरसेवकांनाही याचा फटका बसू लागला आहे. अलीकडेच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्तांचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेच्या एक नगरसेवकास ‘मुंढेंचे गोडवे गाऊ नका, अन्यथा वाळीत टाकू’ अशी तंबी देण्यात आल्याचे समजते.

झपाटय़ाने नागरीकरण होत असलेले घणसोली उपनगर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच सिडकोने घेतला असून वर्षांनुवर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविल्याबद्दल शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील यांनी स्थायी समिती सभेत मुंढे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. दिघा भागातील पक्षाचे आणखी एक नगरसेवक जगदीश गवते यांनीही अशाच एका प्रकरणात मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. यामुळे कमालीचे अस्वस्थ झालेल्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी या दोघा नगरसेवकांना तंबी दिली असून मुंढे यांचे कौतुक कराल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा दिल्याचे वृत्त आहे. जेमतेम दीड-दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या एका नेत्याने यावरून भलतीच आक्रमक भूमिका घेतली असून मुंढेंचे समर्थन करणाऱ्या नगरसेवकांच्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहचविल्या जातील, असा इशाराही देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यापर्यंतही या तक्रारी नेण्यात आल्या असून या मुद्दय़ावरून शिवसेना नगरसेवकांमध्ये मात्र दोन गट पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. मी १४ वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होतो. माझे काका आणि आई सलग या भागाचे नगरसेवक होते. या काळात घणसोली उपनगर महापालिकेकडे हस्तांतरीत व्हावे यासाठी हे दोघेही राबराब राबले. सिडकोच्या पायऱ्या चढून माझ्या आईचे गुडघे झिजले तर काकांचे अकस्मात निधन झाले. घणसोलीवासीयांचे स्वप्न मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत पुर्ण झाले तर त्यांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य आहे. यामध्ये मी पक्षविरोधी काही केले असे मला वाटत नाही, असे  शिवसेना नगरसेवक  प्रशांत पाटील यांनी सांगितले.

मुंढेविरोध हीच भूमिका

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांना मुंढे यांनी नोटिसा काढल्यानंतर भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर सर्वपक्षीय आंदोलनापासून शिवसेनेने फारकत घेतली होती. परंतु, मुंढे यांनी बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेनेही लढाईत शिरकाव केला. शिवसेनेचे स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांचे नगरसेवकपद एका प्रकरणात मुंढे यांनी रद्द केले. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाडय़ा आपल्या हाती राहाव्यात यासाठी धडपडणारे शिवसेनेचे काही नेते अस्वस्थ झाले असून मुंढे यांच्या बदलीसाठी या मंडळींनी मोहीम उघडल्याचे चित्र आहे. एरवी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्याविरोधात आरोपांचा धुरळा उडविणारे नेते मुंढे यांना हटविण्यासाठी मात्र राष्ट्रवादीच्या गळ्यात गळे घालत असल्याने शिवसेनेचा एक मोठा गट अस्वस्थ आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतूक करणाऱ्या नगरसेवकांना वाळीत टाकले जाईल, असा इशारा पक्षात कुणीही दिलेला नाही. शिवसेनेने मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावास पाठींबा दिला कारण प्रकल्पग्रस्त आणि सिडको कॉलनीतील रहिवाशांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. या मुद्दयावरुन शिवसेनेत दुही निर्माण झाल्याचे वृत्त निराधार आहे.  – विजय चौगुले, विरोधी पक्ष नेते.