आपत्कालीन कळ बंद केल्यामुळे ठाणे स्थानकातील सरकते जिने बंद

नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ठाणे रेल्वे स्थानकातील सहा सरकते जिने बंद पडल्याच्या घटनेची पुनरावृत्ती शुक्रवारी सकाळी भर गर्दीच्या वेळी झाली. आपत्कालीन परिस्थितीत सरकते जिने बंद करण्यासाठी जिन्याशेजारीच असलेली कळ (बटण) समाजकंटकांनी बंद केल्यामुळे ते बंद पडले. याकडे रेल्वे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने जिने अर्धा तास बंद होते. त्यामुळे शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. स्थानकात प्रवाशांसाठी सहा सरकते जिने बसविण्यात आले आहेत. त्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या जिन्यांमुळे वृद्ध, अपंगांचा प्रवास काहीसा सुकर झाला आहे, मात्र, सरकते जिने वारंवार बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना पायपीटच करावी लागते. विद्युत प्रवाह खंडीत झाल्यामुळे नववर्षांच्या पहिल्याच दिवशी सकाळी गर्दीच्या वेळेत चार तास सहा सरकते जिने बंद होते. त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

आप्तकालीन परिस्थितीत सरकते जिने बंद करता यावेत आणि संभाव्य अपघात रोखता यावेत, यासाठी जिन्यांशेजारीच कळ (बटण) बसविण्यात आली आहे. काही समाजकंटक ही कळ बंद करतात आणि त्यामुळे सरकते जिने बंद पडतात.

असे प्रकार सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी सकाळी फलाट क्रमांक  तीन-चार आणि पाच-सहावर असलेले दोन सरकते जिने बंद पडले. त्यामुळे याच जिन्यांवरून प्रवाशांना चालत जावे लागले. याबाबत रेल्वे प्रशासन अनभिज्ञ होते. अखेर काही प्रवाशांनी जिने बंद असल्याची तक्रार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने धाव घेऊन हे जिने पुन्हा सुरू केले. अर्धा तास जिने बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

डोंबिवलीतही जिने बंद

डोंबिवली स्थानकातील दोन्ही सरकते जिने शुक्रवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांचेही हाल झाले. हे जिने सुरू करण्यास दोन दिवस लागणार असून तोपर्यंत प्रवाशांचे हाल सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

सरकत्या जिन्यांमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. मात्र सरकत्या जिन्यांची कळ बंद करणाऱ्या समाजकंटकांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आमची नसून ही जबाबदारी रेल्वे विभागाची आहे.

– अक्षय गोसावी, साहाय्यक, जॉन्सन लिफ्ट लिमिटेड

जिन्यातील तांत्रिक बिघाडासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात येते. असे असले तरी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून समाजकंटक सरकते जिने बंद करतात.

– ए. के. जैन, जनसंपर्क अधिकारी