शून्य पटसंख्येमुळे वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळा बंद

वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना उतरती कळा लागली असून शून्य पटसंख्येमुळे या शाळा बंद पडत आहेत. वाघोली, गास डोंगरी आणि राऊतपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश न घेतल्याने या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील ग्रामीण भागात असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या खूपच कमी असल्याचे चित्र आहे.

इंग्रजी शिक्षणाच्या हव्यासापोटी तसेच खासगी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल या अपेक्षेने पालक पाल्याला खासगी शाळांमध्ये दाखल करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत आहे. यंदाही ही घट सुरू राहिल्याने अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वसईतील खराट तारा येथील जिल्हा परिषद शाळेत एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश न घेतल्याने चार वर्षांपूर्वी ही शाळा बंद करण्यात आली होती. यंदा तर तालुक्यातील तीन शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. वाघोली जिल्हा परिषद शाळा, गास डोंगरी जिल्हा परिषद शाळा आणि राऊतपाडा जिल्हा परिषद शाळा ही या शाळांची नावे या शाळांमध्ये सध्या एकही विद्यार्थी शिकत नाही.

वसई तालुक्यात १९७ जिल्हा परिषद शाळा चालू स्थितीत आहेत. मात्र या शाळांमध्ये शहरी भागात म्हणजेच्या वसई पश्चिम पट्टय़ातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून पूर्व पट्टय़ातील ग्रामीण भागात मात्र पटसंख्या चांगली आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या १० तर काही शाळांमध्ये एक हजार विद्यार्थी शिकत आहेत.

गरजू विद्यार्थ्यांना फटका

जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार आणि अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. मात्र दर्जेदार शिक्षण मिळेल या आशेने अनेक पालक खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ देतात. परिणाम कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होत आहेत. मात्र परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, असे एका आदिवासी पालकाने सांगितले.

खासगी शाळांकडे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांंचा अधिक ओढा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांंची संख्या कमी होत आहे. अशामध्ये पटसंख्या शून्य झाल्याने शाळा बंद करण्यात येत आहेत.

– राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी, पालघर जिल्हा