नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांची खंत

सध्याच्या टीव्ही मालिकांचे तंत्रच बदलले आहे. पूर्वी एखादी भूमिका साकारण्यासाठी, त्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळायचा. मालिका, नाटक सुरू होण्यापूर्वी मिळालेली भूमिका पूर्णपणे अंगीकारण्यासाठी तीन ते चार महिने लागायचे. उत्तम तालीम झाल्यानंतरच आपण १०० टक्के चांगले काम करू शकतो, मात्र आता एखाद्या भूमिकेच्या सरावासाठी वेळ मिळत नसल्याने तो भाव आपल्या चेहऱ्यावर येत नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांनी व्यक्त केली.

वसई रविवारी चौथे श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलन झाले. शब्दवेल साहित्य प्रतिष्ठान आणि वसई-विरार शहर महापालिकेच्या वतीने डॉ. धोंडो गोविंद अभ्यंकर वाचनालयात आयोजित केलेल्या या संमेलनात फैयाज यांची मुलाखत घेण्यात आली. ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक मुळात पाठीवर थाप घेऊनच जन्माला आले. या नाटकात प्रत्येकाने बुद्धी आणि हृदयापासून काम केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक आवडले. या नाटकातील प्रत्येक कलावंताचे काम आज लोकांपर्यंत पोहोचले आहे, असे फैयाज यांनी सांगितले.

फैयाज यांनी मुलाखतीतून आपला जीवनप्रवास उलगडला. सोलापुरात असताना केवळ कलापथकात नृत्य सादर करत असत. त्यानंतर हौस असल्याने रंगभूमीवर आले. त्यानंतर मुंबईत आल्यावर ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि ती भूमिका रसिकांना आवडली. पुढे गजल, ठुमरी, लावणी, नाटय़संगीत असा चौफेर प्रवास केल्याचे त्यांनी नमूद केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘पेइंग गेस्ट’, ‘मित्र’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग करताना आलेले अनुभव आणि प्रसंग फैयाज यांनी कथन केले.

या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक ऊर्मिला पवार, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मोघे, स्वागताध्यक्ष आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती भारती देशमुख, शब्दवेल साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पल्लवी बनसोडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘प्रदूषणाचा विळखा रोखणे आवश्यक’

नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलनासाठी निवडलेला पर्यावरण हा विषय अतिशय उद्बोधक आहे. पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा आहे, परंतु आज प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. त्याला रोखले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यक ऊर्मिला पवार यांनी केले.  वसईत अनेक विचारवंत आहेत, त्यांनी वसईचे नाव आज वैचारिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. आजच्या संमेलनाची धुरा एक स्त्री वाहत आहे हे वाखाणण्यासारखे आहे, असे पवार म्हणाल्या.

पर्यावरण जनजागृती करणारी मंगळागौर

नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या मंगळागौर कार्यक्रमाद्वारे पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. माणगाव येथील प्रेरणा ग्रुपने सादर केलेल्या या मंगळागौरमध्ये जुनी पारंपरिक गीते सादर करण्यात आली.

‘फुगडी घालूया फुगडी खेळूया, झाडे लावूया’, ‘कचरा करू नका, स्वच्छता करूया’, ‘पाणी साचवा, झाडे जगवा’ अशा प्रकारच्या पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या गाण्यांवर महिलांनी खेळ सादर केले. सासू-सुनेच्या भांडणातून झाडे लावण्याचा संदेश देण्यात आला. औषधी झाडांचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. काही वेगवेगळ्या प्रसंगांची गीते, खेळ, उखाणेही यावेळी सादर करण्यात आले.