भाईंदरजवळील प्रकार; आरोपी अटकेत
काशिमीरा येथे एका बारा वर्षीय मुलीवर परिचयाच्याच व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी याची माहिती मिळताच त्वरित हालचाल करून आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक केली. रॉबीन पात्रा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या आईच्या ओळखीचा आहे.
मुलीची आई व आरोपी एकाच ठिकाणी कामाला आहेत. पीडित मुलगी पाचव्या इयत्तेत शिकते. ती शाळेतून परत न आल्याने पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तपास सुरू केला. मुलगी रॉबीनसोबत गेल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या लोकेशनच्या आधारे त्याला शोधले व मुलीची सुटका केली. आरोपीने मुलीला बर्फाचा गोळा खायला देतो, असे सांगून आपल्यासोबत नेले व काशिमीरा उड्डाण पुलाखाली एका टेम्पोत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.