रशियातील वसतिगृहातील आगीतून विरारमधील जुळ्या बहिणी सुखरूप; सतर्कतेमुळे खोलीतील आठ मैत्रिणींचीही सुटका
रशियातील स्मोलेक्स मेडिकल अ‍ॅकडमीच्या वसतिगृहात लागलेल्या आगीत महाराष्ट्रातील दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना हृदयाला चटका लावून जात असतानाच, याच घटनेत मूळच्या विरारच्या असलेल्या जुळ्या बहिणी सुखरूपपणे बचावल्या. पहाटे वसतिगृहात उठलेला धूर पाहून या दोघींनी आपल्या खोलीतील आठ मैत्रिणींनाही जागे करत सुरक्षित स्थळी धाव घेतली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे या आठ जणींचेही प्राण वाचले.
रशियाच्या पूर्व मॉस्कोमध्ये असलेल्या वसतिगृहात रविवारी पहाटे लागलेल्या आगीत पुण्यातील करिश्मा भोसले आणि नवी मुंबईतील पूजा कुल्लर या दोघींचा गुदमरून मृत्यू झाला. याच वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावर निधी बक्षी आणि निकी बक्षी (२२) या जुळ्या बहिणींचे वास्तव्य होते. विरार पूर्व येथील श्रीपाल कॉम्प्लेक्स येथे राहणारे व्यावसायिक राजेश बक्षी यांच्या या मुली मेडिकल अ‍ॅण्ड डिस्पेन्सरी या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांला आहेत. आग लागली त्या रात्री निधी नेहमीप्रमाणे अभ्यास करत बसली होती. पहाटेच्या सुमारास झोपायला जाण्यापूर्वी तिने आपल्या वडिलांना ‘गुड मॉर्निग’चा एसएमएस पाठवला. ती झोपायच्या तयारीत असतानाच बाहेरून जळण्याचा वास आला. म्हणून तिने निकीला उठवले. या दोघींना खोलीच्या बाहेर धूर दिसला. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या खोलीत झोपलेल्या आठही मैत्रिणींना उठवले व तळमजल्याच्या दिशेने धाव घेतली. ‘निधी रात्रभर जागत अभ्यास करत नसती तर कदाचित या दुर्घटनेत सापडू शकली असती. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले,’ असे राजेश बक्षी म्हणाले.

पूर्ण दिवस चिंतेत
राजेश बक्षी यांना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वृत्तवाहिन्यांवरून आगीची बातमी समजली. त्यात ‘दोन भारतीय मुलींचा मृत्यू’ असे म्हटल्याने अवघे बक्षी कुटुंब प्रचंड धास्तावले होते. त्या प्रसंगाची आठवण सांगताना बक्षी म्हणाले, ‘दोन्ही मुलींचे फोन लागत नव्हते. महाविद्यालयातून किंवा भारतीय दूतावासातून काहीच माहिती मिळत नव्हती. सुदैवाने त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलाने वडिलांशी संपर्क केल्यानंतर आमच्या मुलीही सुखरूप असल्याचे समजले. मात्र, संध्याकाळ प्रत्यक्षात त्यांच्याशी बोललो, तेव्हाच जीव भांडय़ात पडला.’ ‘निधी व निकी यांचे प्राण वाचले असले तरी पूजा आणि करिश्माच्या मृत्यूचे दु:ख आहेच,’ असेही राजेश म्हणाले.