सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी नगरसेवक शनिवारी सकाळी ठाणे पोलिसांना शरण आले. या चौघांपैकी नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण या दोघा नगरसेवकांना ठाणे न्यायालयाने १४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना अधिक तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतर या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

परमार आत्महत्याप्रकरणातील आरोपी नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज नुकतेच उच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते. तसेच चौघांनाही शनिवारी सकाळी ठाणे पोलिसांना शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सकाळी चारही आरोपी ठाणे पोलिसांना शरण आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांचे कापुरबावडी भागात कार्यालय असून तिथे चौघे आरोपी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हजर झाले. या प्रकरणाचा तसेच आयकर विभागाकडून पोलिसांच्या हाती लागलेल्या डायरीचा सविस्तर तपास करण्यासाठी दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयापुढे केली. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पोलिसांना सहकार्य केले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांकडे हजेरी लावली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागणे योग्य नाही, असा युक्तिवाद दोघा आरोपी नगरसेवकांच्या वकिलांनी केला. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी दोघांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जुन्या घटनेचे धागेदोरे
सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान ठाणे शहरामध्ये २५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका राजकीय नेत्याच्या खुनासंबंधी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी या वृत्तास दुजोरा देत याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या गुन्ह्य़ासंबंधी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचेही स्पष्ट केले.