ठाणे :  करोना केंद्रातील रेमडेसीवीर औषधाचा विक्रीसाठी नसलेला साठा रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे आकारून विकल्याप्रकरणी  आतीफ अंजुम (२२) आणि प्रमोद ठाकुर (२१) या दोघांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.  त्यांच्याकडून रेमडेसीवीरची २१ इंजेक्शन जप्त करण्यात आली.

आतीफ हा मुलुंडमधील एका नर्सिंग होममध्ये सहाय्यक म्हणून काम करतो. जप्त करण्यात आलेल्या २१ पैकी १६  पाकिटांवर ‘नॉट फॉर सेल’ म्हणजेच ‘विक्रीसाठी नाही’ असे लिहिले आहे. ही औषधे ठाणे महापालिकेच्या करोना केंद्रातून मिळाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

जिल्ह्यत ५,७५४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यत शनिवारी ५ हजार ७५४ नवे करोना रुग्ण आढळून आले.  २४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यत  बाधितांची संख्या ३ लाख ७३ हजार ३६४  झाली  आहे. दिवसभरात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ हजार ९९६, ठाण्यात १ हजार ४६४, नवी मुंबई ८९३, मिरा भाईंदर ४६१, अंबरनाथ ३२४, उल्हासनगर २१२, बदलापूर १९२, भिवंडी १११, ठाणे ग्रामीण क्षेत्रात १०१ रुग्ण आढळून आले.