ठाणे : भिशी आणि जादा परतावा देतो असे सांगून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुडवीन ज्वेलर्स या कंपनीचे मालक सुनीलकुमार अकराकरण आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीरकुमार अकराकरण या दोघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली आहे.

या दोघांनी ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील १ हजार १५४ गुंतवणूकदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी येथील विविध पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. गुडवीन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीरकुमार हे दोघे मुख्य आरोपी शुक्रवारी दुपारी ठाणे न्यायालयात शरण येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून या दोघांना न्यायालयातून ताब्यात घेऊन अटक केली. गेल्या दीड महिन्यांपासून पोलीस त्यांच्या शोधात होते. दोघेही फरार झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांच्या केरळ व तमिळनाडू येथील २६ स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या. बँक खाती देखील गोठवली होती. त्यांची आर्थिक कोंडी झाल्यानंतर ते ठाणे न्यायालयासमोर शरण आले.

फसवणुकीची पद्धत..

२००५ मध्ये अकराकरण यांनी गुडवीन ज्वेलर्स कंपनी स्थापन केली होती.  २०१२ मध्ये त्यांनी कंपनीच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या होत्या. गुंतवणूकदारांना एका वर्षांत १६ ते १८ टक्के व्याजदर, पाच वर्षांत दामदुप्पट यांसारख्या योजनांचा यात सामावेश होता. या अमिषाला हजारो गुंतवणूकदार बळी पडले होते.