नालासोपाऱ्यात दोन सख्ख्या भावांच्या आत्महत्येमागील गूढ कायम; पळून गेल्यानंतर एटीएममधून ३४ हजार रुपये काढले

नालासोपाऱ्यातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांनी ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. या मुलांनी काही दिवसांपूर्वी नवा मोबाइल घेण्यासाठी घरातून एटीएम कार्डची चोरी करून पैसे काढले होते. ही चोरी पकडली जाईल या भीतीने त्यांनी घरातून पळ काढला होता. हेच या आत्महत्येमागील कारण असल्याचा पोलिसांचा कयास आहे. मात्र घरातून पळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ३४ हजार रुपये का काढले याचे गूढ मात्र अद्याप उलगडलेले नाही.
नालासोपारा पूर्वेच्या बाबूलपाडा येथील मटकेवाडी चाळीत कुंदन गुप्ता हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. गुरुवारी दुपारी त्यांची दोन्ही मुले प्रवीण गुप्ता (१६) आणि अरुण गुप्ता (१३) हे घर सोडून गेले होते. शनिवारी रात्री दोघांचे मृतदेह नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ रुळावर सापडले होते. दोन सख्ख्या भावांच्या अशा मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे. मोबाइलचे वेड या मुलांना होते. त्यासाठी त्यांनी घरातील एटीएम कार्ड चोरी करून त्यातील पैसे काढले होते. ही चोरी पकडली जाईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी सांगितले.
नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी या दोन्ही भावांनी एक मोबाइल विकत घेतला होता. घरातील एटीएम कार्ड चोरून त्यातून सहा हजार रुपये काढून त्यांनी हा मोबाइल विकत घेतला होता. परीक्षा जवळ आली, मग नवा मोबाइल कशाला हवा, असे त्याच्या आईने विचारले, तेव्हा जुना मोबाइल विकून त्यांनी नवीन मोबाइल विकत घेतल्याची थाप त्याने मारली. त्यांच्या आईने या दोन्ही भावांच्या मित्राकडे चौकशी केली तेव्हा प्रवीणने नवीन फोन स्वत:च्या पैशांनी विकत घेतल्याचे सांगितले. आपले बिंग फुटले या भीतीने त्याच दिवशी दोन्ही भावांनी घरातून पलायन केले होते.
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही भावांनी फलाट क्रमांक चारवर धावत्या लोकल ट्रेनखाली जीव दिला. शनिवारी रात्री वसई रोड रेल्वे पोलिसांना या दोन्ही भावांचे मृतदेह सापडले. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोबाइल आणि पैसे सापडले नाहीत. शुक्रवारी या दोन्ही भावांनी नालासोपारा येथील एका एटीएममधून ३४ हजार रुपये काढले होते. ते पैसे का काढले आणि पैसे गेले कुठे याचे गूढ उलगडलेले नाही. घरातून पळून गेल्यानंतर दोन दिवस ते कुठे राहत होते याचा पोलीस तपास करत आहेत.
मुलांचा जीव वाचला असता..
मुले बेपत्ता झाल्यावर त्यांचे वडील कुंदन गुप्ता यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.शनिवारी रात्री अलकापुरी येथे कुंदन गुप्ता यांना दोन्ही मुले दिसली. त्यांनी मुलांकडे जाऊन घरी येण्यास सांगितले, पण दोन्ही भावंडे वडिलांच्या हाताला झटका देऊन पसार झाली. आपली मुले रागावली असतील, थोडय़ा वेळाने घरी परततील, असा त्यांनी विचार केला आणि ते निघून गेले. माझी मुले सापडली, असेही त्यांनी पोलिसांना कळवले होते; पण त्याच्या काही वेळातच दोन्ही मुलांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर गुप्ता कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. त्याच वेळी मी मुलांना पकडण्याचा प्रयत्न का केला नाही, याची सल त्यांना बोचत आहे.

या मुलांना मोबाइलचे वेड होते. नवीन मोबाइल हवा म्हणून त्यांचा हट्ट होता. त्यासाठी त्यांनी चोरी केली आणि तीच त्यांच्या जिवावर बेतली.
– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज