ठाणे : भिवंडी येथील काल्हेर परिसरात गुरुवारी सकाळी एका इमारतीमधील घरात शिरलेल्या चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ८६ लाख रुपयांचा ऐवज लटून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या दरोडेखोरांचा नारपोली पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

भिवंडी येथील काल्हेर परिसरातील बी सी अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शुभम जगदीश पाटील (२३) हे कुटूंबासोबत रहातात. त्यांचे वडील जगदीश पाटील हे गुरुवारी सकाळी ६ वाजता फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. काही वेळाने चार दरोडेखोरांनी त्यांच्या इमारतीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर घरात शिरले. त्यावेळेस शुभम आणि त्यांची आई व बहीण हे तिघे घरात झोपलेले होते. दरोडेखोरांनी त्यांच्या आईला बंदुकीचा धाक दाखवून दोरीने बांधले. त्यानंतर दरोडेखोरांनी शुभम आणि त्याच्या बहिणीकडून कपाटाची चावी घेऊन त्याद्वारे कपाट उघडून एक कोटी ८६ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्यामध्ये १ कोटी २६ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ६० लाखांच्या रोख रकमेचा समावेश आहे. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे भिवंडी परिमंडळाचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.