तीन दुर्घटना; दिवा-दातिवलीदरम्यान रेल्वेच्या धडकेत गँगमनने पाय गमावले
दिवा स्थानक परिसरात रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीसह दोन मुलींचा मृत्यू झाला. अनिशा शाहू (वय ५) आणि अंकिता नारे (वय २०) अशी या मुलींची नावे आहेत. तिसऱ्या अपघातात दिवा-दातिवलीदरम्यान रेल्वेच्या धडकेत गँगमन राजाराम गायकर (५५) यांनी दोन्ही पाय गमावले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दिव्यातील नागवाडी परिसरातील तुळशीराम निवास इमारतीत राहणारी अंकिता नारे मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी सकाळी रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर नेहमीप्रमाणे रेल्वे रुळ ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीकडे जात असताना रेल्वेच्या धडकेत ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ दिव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दिवा परिसरातच बुधवारी सकाळी आशा शाहू ही महिला आपली मुलगी अनिशा हिला घेऊन मुंबईत जाण्यासाठी दिवा स्थानकात येत होत्या. त्याच वेळी धिम्या मार्गावर मुंबईकडून येणारी आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही गाडय़ा एकाच वेळी आल्या. घाबरलेल्या आशा दोन्ही गाडय़ांच्या मध्ये उभ्या होत्या. गाडीच्या हवेच्या झोतामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या रुळांवर कोसळल्या. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या अनिशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.

गँगमन जायबंदी
रेल्वे रुळावर काम करणाऱ्या गँगमनसाठी हे काम करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बुधवारी सकाळी दिवा आणि दातीवली स्थानकादरम्यान राजाराम गायकर (५५) काम करीत होते. त्यांना रेल्वेची धडक बसली. राजाराम यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
अनिशा शाहू

मध्य रेल्वे विस्कळीत
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेवर आटगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. हे कपलिंग दुरुस्त करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागला.
अखेर पावणेचारच्या सुमारास बिघाड दुरुस्त होऊन मालगाडी पुढे मार्गस्थ झाली. मात्र तोपर्यंत गोदावरी, मंगला आदी गाडय़ाही रखडल्या. याचा परिणाम संध्याकाळच्या डाऊन दिशेकडील वाहतुकीवरही जाणवत होता. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले. यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.