देसलेपाडा येथील खूनाचे गूढ उकलले

डोंबिवली : डोंबिवलीतील देसलेपाडा येथील आत्माराम वारंग यांच्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह दोन महिन्यांपूर्वी एका इमारतीच्या मलनि:सारण टाकीत आढळून आला होता. मुलाच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपींना या प्रकरणी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

एहसान साबीर आलम (२२ रा. सागर्ली), नदिम जाकीर आलम (२१, रा. सागर्ली) या दोघांना मानपाडा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी बिहार येथे जाऊन अटक केली.

मे महिन्यात आत्माराम यांचा मुलगा घराबाहेर खेळताना अचानक गायब झाला. नंतर त्याचा मृतदेह या भागातील नवनिर्मित ‘आर्चिड’ इमारतीच्या मलनि:सारण टाकीत सापडला. त्याला गुंगीचे औषध देऊन आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले. उपायुक्त डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, जयेंद्र भोयर, महेश जाधव, किरण वाघ, उपनिरीक्षक अविनाश पाळदे, पोहवा, पवार, घार्गे, सपकाळे, दळवी, चौरे, निकाळे, भालेराव कामत,  गडगे अशा १० हवालदारांचे पथक दोन महिने या प्रकरणाचा तपास करीत होते. अखेर आलम बंधूंना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी गुन्ह्यची कबुली दिली आहे.