महावितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

विरार :  वसई-विरारमध्ये टाळेबंदी आणि नंतरच्या काळात महावितरण विभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. ग्राहकांना लाखो आणि कोटय़वधीची देयके आल्याचे प्रकार उघडकीस आल्याने महावितरण कंपनीच्या कारभारावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. महावितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापर्यंत  २ लाख ४२ हजार ६९६ वाढीव वीज देयकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात महावितरण विभागातून मीटरचे वाचन न घेता सरासरी  देयक नागरिकांना पाठविण्यात आली होती. यात नागरिकांना हजारो आणि लाखोची देयक आली आहेत. महावितरण विभागाकडून जून २०२० पासून मीटर वाचन घेतले जात असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतरसुद्धा नागरिकांना वाढीव बिले येण्याचे प्रकार सुरूच असल्याने महावितरण कंपनीकडून मीटरचे वाचन घेणाऱ्या कंपनीकडून चुकीचे वाचन घेतल्याने नागरिकांना वाजवीपेक्षा अधिक देयक येणाच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.

वसई विरार परिसरात मागील काही महिन्यांपासून ग्राहकांना अवाच्च्या सव्वा देयक येत आहेत. त्यात महावितरण विभागाकडून नेमलेल्या ठेकेदाराकडून घेतले जाणारे मीटरचे रीडिंग चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  नालासोपाऱ्यात एका गिरणीला ७९ कोटी बिल धाडल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा रीडिंग एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे वीज ग्राहकाला भरुदड पडल्याचे उघड झाले असून ग्राहकाचे कनेक्शन तोडण्यात आल्याने घरात मृत्यूशी झुंज देणारी ग्राहकाची आई असताना सुद्धा वीज जोडणी तोडल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. दरम्यान एजन्सीने एकत्र वाचन घेतल्याने हे देयक जास्त आले असून त्यांना सुलभ हफ्ते करून दिल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांनी सांगितले.

नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुजित सिंग यांनी मार्च २०१९ ला वर्षांपूर्वी घर घेतले होते त्यांना दर महिन्याला ७०० ते ८५० मार्च २०२० पासून देयक  भरले नव्हते. जून २०२० ला ३,४५० तीन महिन्याचे देयक आले. जुलै २०२० ला ५३,००० दिले ऑगस्ट २०२० ला मीटर तपासणी  करण्यासाठी येतो सांगितले पण ते आलेच नाही. मात्र जानेवारी २०२१ ला १ लाख १४० रुपयाचे देयक आले. यावेळी सिंग यांनी विचारणा केली असता त्यांना ३० टक्के कपात करून ६४ हजार रुपयाचे देयक भरण्यास सांगितले. यामुळे  वाचनमध्ये  तफावत असल्याचा आरोप सिंग यानी केला आहे.

वसई सर्कलमध्ये २ लाखांहून अधिक वाढीव वीज देयकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यातील बहुतांश तक्रारीचे आम्ही निवारण केले आहे, काही ठिकाणी रीडिंग अधिक आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यात आम्ही चौकशी करत आहोत, लवकरच त्यांचेसुद्धा निवारण केले जाईल.

– विजय दुभाटे,  जनसंपर्क अधिकारी महावितरण