परदेशात तस्करीचा ठाणे पोलिसांना संशय
कोटय़वधी रुपये किमतीची भगवान महावीरांची पंचधातूची पुरातन मूर्ती विकण्यास आलेल्या दोघा दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन किलो वजनाची ही मूर्ती जप्त केली आहे. आठव्या किंवा दहाव्या शतकातील जैन धर्मीय कीर्तनकारांची ही मूर्ती असावी, असा पोलिसांचा अंदाज असून याबाबत पोलिसांचे पथक पुरातत्त्व विभागाकडून अधिक माहिती घेत आहे.
या तस्करीमध्ये आणखी काही साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती तपासात पुढे आली असून ही तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने आता तपास सुरू केला आहे.
मंगेश मारुती साळवी (५०) आणि कमलेश कांतीलाल अजमेरा (४६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली परिसरात राहतात. एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी कळवा भागात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्या वेळी त्यांच्या पथकाने मंगेश आणि कमलेश या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॉक्सची तपासणी केली. त्यामध्ये भगवान महावीरांची पंचधातूची पुरातन मूर्ती सापडली.
या मूर्तीची किंमत सुमारे एक कोटी रुपयांच्या घरात आहे. हे दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाहीत. तसेच त्यांच्याकडून या मूर्तीबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नसल्याचे मणेरे यांनी सांगितले.

पुरातत्त्व विभागाची मदत घेणार
ठाण्यातील काही पुरातन वस्तूंच्या अभ्यासकांनी या मूर्तीची पाहणी केली असून आठव्या किंवा दहाव्या शतकातील ही मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या मूर्तीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा अभिप्राय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.