एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव; भिवंडी, बदलापूरजवळ विकास

मुंबई, ठाण्याला पर्याय म्हणून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उशिरा का होईना, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर या शहरांच्या वेशीवर नवी शहरे उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. प्राधिकरणाच्या येत्या वीस वर्षांतील भविष्यवेध उपक्रमात या प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील १० भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पाच मुख्य अभियंते आणि २२ नियोजनकारांच्या पथकाने मुंबई महानगर प्रदेशाचा २०१६ ते २०३६ पर्यंतचा नवीन शहर विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात भिवंडी सराऊंडिंग नोटिफाईड एरिया (बसना) आणि अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर सराऊंडिंग नोटिफाईड एरिया (अकबसना) या नव्याने उभारण्यात येणाऱ्या शहरांची आखणी करण्यात आली आहे. भिवंडीजवळच्या नियोजित शहरासाठी १५१ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे, तर अंबरनाथ-बदलापूरलगत १३८ चौरस किलोमीटर क्षेत्र नव्या शहराच्या आखणीसाठी प्रस्तावित आहे. नवी मुंबईजवळ यापूर्वीच सिडकोमार्फत नयना या ४८४ चौरस किलोमीटर क्षेत्रात वसविण्यात येणाऱ्या शहराची रचना करण्यात आली आहे. नयनाच्या धर्तीवर या दोन शहरांची नियोजनबद्ध आखणी केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. भिवंडी महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या हद्दीत या नवीन शहरांची उभारणी करण्यात येणार असली तरी या नवीन शहरांचे विशेष नियोजन प्राधिकरण हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असणार आहे.

भिवंडी शहराची लोकसंख्या सुमारे सात लाखांच्या घरात तर अंबरनाथ-बदलापूर या शहरांची मिळून साधारणपणे चार लाखांच्या घरात आहे. एमएमआरडीएच्या स्थापनेवेळी महानगर प्रदेश पालिका हद्दीतील लोकसंख्यावाढीचा वेग १.४ टक्के होता. तो २०११ च्या जनगणनेप्रमाणे ७.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. नागरीकरणाचा वेग ७.२७ टक्क्यावरून २१.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबई उद्योग, व्यावसायिकांची कार्यालये, वाढते नागरीकरण यामुळे गजबजून गेली आहे. या गजबजलेल्या शहरावर यापुढे लगतच्या ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील नागरीकरणामुळे वाढणाऱ्या शहरांचा, नोकरी, व्यवसाय, उद्योग यांचा कोणताही भार पडू नये यासाठी नवीन शहरांची आखणी केली जात असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. याच भागात उद्योग, व्यवसाय, रोजगार, विकास केंद्र, कार्यालय निर्माण करून देणे, अत्यावश्यक सरकारी कार्यालये त्या त्या भागात स्थलांतरित करून स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देणे, या व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून तेथे रस्ते, बाह्य़वळण रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशा नागरी सुविधा देणे हा भिवंडी, बदलापूर परिसरात नवीन शहर उभारण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

२०३६पर्यंत नागरी सुविधा

१९८१ च्या जनगणनेप्रमाणे मुंबई महानगर परिक्षेत्रात एक बृन्मुंबई महापालिका, १३ नगरपालिका, २४ शहरे आणि १ हजार १६६ गावांचा  समावेश होता. याच परिक्षेत्रात २०११ च्या जनगणनेप्रमाणे ८ महापालिका, ९ नगरपालिका, ३५ शहरे आणि ९९४ गावांचा समावेश आहे. या वाढत्या नागरीकरणाचा मुंबई शहरावरील भार कमी करण्यासाठी २०३६ पर्यंत महानगर प्रदेश क्षेत्रातील भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, २७ गाव परिसरात विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा मानस आहे.