१५ लाखांचा अल्प्राजोलमचा साठा जप्त

गुंगीच्या औषधांमध्ये वापरले जाणाऱ्या अल्प्राजोलम या अमली पदार्थाची बेकायदा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून १५ लाखांचा अल्प्राजोलमचा साठा जप्त करण्यात आला आहे.

त्याचा नशेकरिता वापर करण्यासाठी त्याची विक्री केली जाणार होती. अंबरनाथ भागातील एका औषध कंपनीमधील हा साठा असल्याची प्राथमिक माहिती पुढे येताच पोलिसांनी संबंधित कंपनीची चौकशी सुरू केली आहे. या वृत्तास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दुजोरा दिला आहे.

अमित भीमराव गोडबोले (३२) आणि लवकुश पप्पू गुप्ता (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते अंबरनाथ परिसरातील रहिवासी आहेत. ठाणे येथील तलावपाळी परिसरात हे दोघे अल्प्राजोलम हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री सापळा रचून दोघांना अटक केली. त्यावेळी या दोघांकडून अल्प्राजोलमचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषध कंपनीमधील साठा

अल्प्राजोलम हा अंमली पदार्थ गुंगीच्या औषधांमध्ये वापरले जाते. मात्र, त्याचा नशेकरिता वापर करण्यासाठी हे दोघे त्याची बेकायदेशीर विक्री करणार होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच अंबरनाथ भागातील एका औषध कंपनीमधील हा साठा असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित कंपनीची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.