उल्हास नदीत एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्याजवळ दोन तरूण बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत तरूणांचा शोध सुरू होता. गेल्या काही दिवसांतील संततधार आणि अचानकपणे येणाऱ्या पावसाने उल्हास नदी पात्रात अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होत असते. रविवारी बदलापूर नदीकिनारा परिसरात राहणारी शाळकरी मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नांनतर त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. मंगळवारी पुन्हा दोन तरूण या नदीमध्ये वाहून गेल्याचे समोर आले.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे प्रमुख आर बी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास उल्हासनगर येथून पाच महाविद्यालयीन तरूण बॅरेज बंधाऱ्याच्या खालच्या बाजूनं पोहण्यासाठी आले होते. त्यातील दोन जण नदीत बुडाले. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली. मात्र दुपारी  झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने सायंकाळी ६ च्या सुमारास शोध कार्य थांबवण्यात आले. पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान हे दोन तरूणांपैकी एक तरूण उल्हासनगर कॅम्प चार येथील रहिवासी असून दुसरा अंबरनाथमधील वडवली येथे राहत असल्याचे समजते.