हळदी समारंभावरून परतताना अपघात; चौघे जखमी

ठाणे : मित्राच्या हळदीचा समारंभ आटोपल्यानंतर घरी परतत असताना कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, चार जण गंभीर जखमी झाले. घोडबंदर येथील मानपाडा येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. हे सर्व जण मानपाडा परिसरातील राहणारे आहेत.

अंकुश यशवंत चांदवडे (२८), अर्जुन श्रीपथ पारधी (४१) अशी मृतांची नावे असून संजीव रंगीलाल जैस्वाल, दीपक बाबू कांबळे, जगदीश अवतारसिंग सलुजा ऊर्फ राजू आणि शैलेश अरविंद पाटील हे जखमी आहेत. शैलेश पाटील हा अ‍ॅपआधारित कार चालवण्याचे काम करतो. बुधवारी मानपाडा परिसरातील मित्राच्या हळदी समारंभासाठी तो आला असता आपली कार त्याने ठाणे-घोडबंदर मार्गिकेवर उभी केली होती. समारंभ संपल्यानंतर तो विरुद्ध दिशेला असलेली आपली कार आणण्यांसाठी निघाला. त्यावेळी इतर पाच मित्रही त्याच्यासोबत निघाले. ब्रह्मांड येथून वळण घेतल्यानंतर मानपाडा उड्डाणपुलावरून गाडी नेत असताना शैलेशचा कारवरील ताबा सुटला व ती भरधाव वेगाने पुलाच्या कठडय़ावर आदळली. ही धडक इतकी जबर होती की, अंकुश आणि अर्जुन यांचा जागीच मृत्यू झाला. कारच्या पुढच्या बाजूसह मागील दरवाजा आणि मागची चाकेही या धडकेत तुटून पडली. स्थानिकांच्या मदतीने या सर्वाना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शैलेश याच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तोही अपघातात गंभीर जखमी असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

धाकटय़ापाठोपाठ मोठय़ा भावाचाही मृत्यू

अंकुश चांदवडे हा मानपाडय़ातील शिवाजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहतो. त्याचे वडील रिक्षा चालवण्याचे तसेच बदली वाहनचालक म्हणून काम करतात. अंकुश हा वातानुकूलित यंत्रांच्या दुरुस्तीचे काम करायचा. त्याला पत्नी व पाच वर्षांचा मुलगाही आहे. दोन महिन्यांपूर्वीच अंकुशच्या धाकटय़ा भावाचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ अंकुशचाही मृत्यू झाल्याने चांदवडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे, अपघातातील दुसरा मृत अर्जुन हा आपल्या दोन्ही मोठय़ा भावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. ट्रकचालक असलेल्या अर्जुनच्या घरातच ही दोन्ही कुटुंबे राहात होती. त्यामुळे अर्जुनच्या मृत्यूमुळे एकाच वेळी तीन कुटुंबे पोरकी झाली, अशी प्रतिक्रिया त्यांच्या परिचितांनी दिली.