माजीवडय़ातील इमारत पाच वर्षांपासून वापराविना

जुन्या ठाण्याच्या वेशीवर असणाऱ्या माजीवडा गावात पाच वर्षांपूर्वी बांधलेली दुमजली समाज मंदिराची वास्तू वापराविना पडून आहे. इमारतीचे रितसर उद्घाटन झाल्याचे दर्शनी भागात लावलेल्या शिलाफलकावरून दिसून येते. मात्र धक्कादायक म्हणून महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांमध्ये या इमारतीची अद्याप नोंद होऊ शकलेली नाही. केवळ या तांत्रिक कारणाने लाखो रूपयांची ही वास्तू अक्षरश: धूळ खात पडून आहे.

माजीवडा गावात २०११ मध्ये तत्कालीन नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या कार्यकाळात चांगाई देवी मंदीरा शेजारी पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन एक दुमजली इमारत बांधली. या इमारतीमध्ये समाज मंदिर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी दोन सभागृहे बांधण्यात आली होती. मात्र, पाच वर्षे उलटूनही हे समाज मंदिर भवन वापरासाठी खुले करण्यात आलेले  नाही. तसेच माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या दिरंगाईमुळे पालिकेच्या या इमारतीची स्थावर मालमत्ता विभागात अद्याप नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अतिशय सुस्थितीत असलेली ही इमारत गर्दुल्ल्यांचा अड्डा बनण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. तत्पूर्वी त्या इमारतीचा वापर सुरू करावा, असे आवाहन नागरिक करीत आहेत.

याविषयी माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, याविषयी माहिती घेऊन सांगते असे त्यांनी सांगितले.

‘नोंदणी न झाल्याने खुले करण्यास मनाई’

अनेक महिन्यांपासून या इमारतीचा वापर सुरू व्हावा यासाठी माजिवडा सेवाभावी जेष्ठ नागरिक संस्था प्रयत्न करत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, या इमारतीत अद्याप पायाभूत सुविधांची पूर्तता झाली नसल्याने तसेच पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे नोंदणी झाली नसल्याने हे समाजमंदीर खुले होत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल भदे यांनी सांगितले. माजिवडा गावात अनेक जेष्ठ नागरिक आहेत. इमारतीचा वापर सुरू झाला तर ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध होऊ शकेल, असेही ते म्हणाले.