21 January 2021

News Flash

सातबारामध्ये फेरफार करणारे २ तलाठी निलंबित

विकासकाला ‘टीडीआर’ मिळून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप

प्रतीकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : देवीचापाडा येथील सातबारा उताऱ्यात २००३ ते २००७ या कालावधीत दोन तलाठय़ांनी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यकाळात फेरफार केले. त्याचा गैरफायदा एका विकासकाने घेऊन त्या चुकीच्या सातबाराच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली पालिकेतून विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) घेतला. या प्रकरणाची एका नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून कल्याण तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत दोन तलाठी दोषी आढळून आले. त्यांना निलंबित करण्यात आले.

शिवाजी भोईर आणि बी. बी. केदार अशी गुन्हा दाखल तलाठय़ांची नावे आहेत. ठाकुर्लीचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २००३ ते २००७ या कालावधीत शिवाजी भोईर आणि बी. बी. केदार हे मौज गावदेवी विभागाचे तलाठी होते. या कालावधीत गटवारी पद्धत लागू झाली होती. हे माहिती असताना दोन्ही तलाठय़ांनी मौजे गावदेवी येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३५०(अ) सातबारा उतारामध्ये खाडाखोड करून तो स. क्र. ३२ दाखविली. तसेच त्या उताऱ्याच्या आधारे गुरुनाथ सखाराम म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेकडून या फेरबदल सातबाराच्या नावाने कोटय़वधीचा टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) घोटाळा केला असल्याची तक्रार नगरसेवक प्रकाश भोईर यांनी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांच्या आदेशावरून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत गुरुनाथ म्हात्रे यांनी जून २००३ मध्ये फेरबदल केलेल्या सातबारा उताऱ्याच्या अनुषंगाने टीडीआरसाठी अर्ज केल्याचे आढळून आले.

हा टीडीआर घेताना म्हात्रे यांनी स. क्र. ३५०(अ) (नवीन स. क्र. ३२) जोडलेला आहे. हा उतारा तलाठी शिवाजी भोईर यांनी निर्गमित केला होता. सातबारा उताऱ्यात खाडाखोड असल्याची बाब भोईर यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास वेळीच आणली नाही. स. क्र. ३५०(अ) वरील ३ हेक्टर ७२ गुंठे क्षेत्रावरील १८ हजार ५२५ चौरस मीटर क्षेत्र कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नावाने वर्ग झाले आहे. आरोपीस फायदा होईल अशा हेतूने शिवाजी भोईर आणि बी. बी. केदार या तलाठय़ांनी वरिष्ठांना अंधारात ठेवून आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ३५०(अ)चा सव्‍‌र्हे क्रमांक चुकीच्या पद्धतीने स. क्र. ३२ असा नमूद केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी  तहसीलदार दीपक आकडे यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी गायकवाड यांनी या दोन्ही तलाठय़ांविरोधात तक्रार दिली असून त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:49 am

Web Title: two talathi arrested for doing changes in sat bara dd70
Next Stories
1 ई-चलान थकित दंडाची वसुली जोरात
2 दुप्पट भाडे अन् चार प्रवासीही!
3 अनधिकृत बांधकामांवर कारवाई
Just Now!
X