आलिशान गाडय़ांच्या काचा फोडून आतील बॅगा वा किमती ऐवज लुटणाऱ्या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे.
या दोघांनी आजवर पाच गुन्ह्य़ांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या दोघांनी ठाणे ग्रामीण, पालघर जिल्हा आणि मुंबई शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचा संशय आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. कारचे दरवाजे चावीने बंद होत असल्यामुळे अनेकांना ती सुरक्षित वाटते. यामुळे महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आदी साहित्य कारमध्येच ठेवतात आणि ती बंद करून कामासाठी निघून जातात, मात्र, चोरटे कारच्या काचा कापून आतील ऐवज लंपास करतात. काही महिन्यांपासून भाईंदर, मीरा रोड आणि काशिमीरा भागांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात चोरटे आलिशान गाडय़ांच्याच काचा फोडत असल्याचे तपासात समोर आले होते. यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने तपास करून जयनंद ऊर्फ प्रकाश नरेंद्र मंडल (३२, रा. भाईंदर) व मुकेश ऊर्फ उपेंद्र मिस्त्रीलाल सोनी (२२, रा. नालासोपारा) या दोघांना अटक केली. दोघांनी पाच चोऱ्यांमध्ये भाईंदरमधील दोन, मीरा रोडमधील एक आणि काशिमीरा येथील दोन चोऱ्यांचा समावेश आहे