कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयातील गोंधळाबाबत नाराजी

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात धुडगूस घातल्याबद्दल पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच गणेशोत्सवानंतर शहराचा दौरा करून पक्षाच्या सर्वच नगरसेवकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. त्याच वेळी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पदावरून हटवण्याचा विचार नसल्याचे संकेत देत यासाठी आक्रमक झालेल्या सेनेच्या दुसऱ्या गटाला उद्धव यांनी गप्प राहण्याचा सल्ला दिला.

कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याविरोधात आक्रमक झालेला पक्षाचा मोठा गट, शहरातील कामे होत नसल्याच्या तक्रारी आणि यावरून अलीकडेच आयुक्तांच्या दालनात घालण्यात आलेला गोंधळ या सर्व पाश्र्वभूमीवर पक्षाच्या नगरसेवकांची एक बैठक सोमवारी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झाली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत देवळेकर यांनी पालिकेची आर्थिक स्थिती व प्रगतिपथावर असलेली विकासकामे याविषयी पक्षप्रमुखांना माहिती दिली.

या वेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पालिकेतही भाजप नगरसेवकांची कामेच प्राधान्याने केली जातात, अशी तक्रार उद्धव यांच्याकडे केली. त्यावर ‘विकासकामे होत नसतील तर तुम्हा चाळीस नगरसेवकांसमोर बोलण्यापेक्षा मीच कल्याण-डोंबिवलीत गणपती नंतर येतो. तेथे सर्वासमोर बोलूयात,’ असे उद्धव यांनी उपस्थितांना सुनावले. त्याच वेळी या मुद्दय़ावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कल्याण पश्चिमेतील नगरसेवक असलेले राजेंद्र देवळेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकत शिवसेनेने तेथील भाजपच्या वाढत्या प्रभावास आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी पक्षातील मोठा गट त्यांना सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत नाही. या गटाने देवळेकर यांना हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

परंतु, विकासकामे होत नसल्याबद्दल आधीच पक्षावर टीका होत असताना नेतृत्वबदल केल्यास अपयशाचे धनी व्हावे लागेल, या भीतीने बैठकीत देवळेकर यांच्या विरोधात शब्दही निघाला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘ही नेतृत्वबदलाची वेळ नाही,’ असे नगरसेवकांना सुनावल्याचे समजते.