वसई : वसईतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसईचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत, असे सांगून ठाकूर यांच्यावर टीका करणे टाळले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या सभेत ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले आहे. जे राज ठाकरे यांना जमले नाही, ते उद्धव ठाकरे यांनी करवून दाखवल्याची चर्चा वसईत रंगली आहे.

वसई-विरारकडे आजवर दुर्लक्ष झाल्याची कबुली ठाकरे यांनी दिली. वसईतील गुंडगिरी मोडून काढू, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. त्यामुळे शिवसैनिकात उत्साह संचारला होता. जे राज ठाकरे यांनी करायला हवे होते, ते उद्धव ठाकरे यांनी केले, अशी चर्चा वसईत रंगली होती.

राज ठाकरे यांच्या मौनाबद्दल उमटलेली नाराजी ‘मातोश्री’पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे वसईत गेलो तर ठाकूर यांच्याविरोधात बोलावेच लागणार होते, असे एका शिवसेना नेत्याने सांगितले. आम्हीही अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता आमच्या नेत्यांनी वसईत लक्ष घालण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले.