उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत भर

उल्हासनगर महापालिकेच्या प्रलंबित असलेल्या स्थानिक संस्था कराचे खाते बंद करण्यासाठी पालिकेकडे अखेरचे वर्ष शिल्लक असताना स्थानिक संस्था कर विभागाने तीन महिन्यांत तीन कोटींची वसुली केली आहे. गेल्या काही वर्षांतली ही सर्वाधिक वसुली असल्याचा दावा केला जात आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत भर घालणारे विविध मार्ग विविध टप्प्यांवर बंद झाल्याने त्याचा परिणाम शहराचा विकासकामांवर झाला आहे. त्यामुळे जुनी वसुली करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. सात वर्षांपूर्वी बंद झालेला स्थानिक संस्था कराचे खाते मात्र अद्याप बंद झालेले नाही. त्यामुळे सात वर्षांनंतर हे खाते बंद करण्यासाठी पालिका प्रशासनाने जोमाने प्रयत्न सुरू केले आहे. मे आणि जून महिन्यांत यासाठी पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांच्याकडे या विभागाचा कारभार दिला होता. त्या वेळी डॉ. भदाणे यांनी जवळपास १४ हजार खातेदारांना कर निर्धारणासाठी नोटिसा पाठवल्या होत्या. त्यामुळे करबुडव्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्याविरोधात अनेक व्यापाऱ्यांनी हा कर भरणार नाही, अशी भूमिका घेत या नोटिसांना विरोध केला होता. त्यानंतरही स्थानिक संस्था करवसुली विभागाने वसुली प्रकरणांची सुनावणी सुरूच ठेवली होती. पालिकेच्या तिजोरीत त्यामुळे तीन कोटी रुपयांची भर पडली आहे.

४० महिन्यांत अवघी एक कोटीची वसुली

यापूर्वीच्या तीन वर्षांतल्या विविध उपायुक्तांनी एक हजार व्यापाऱ्यांचे अंतिम कर निर्धारण करून पालिकेच्या तिजोरीत अवघी दोन कोटी ७९ लाख रुपयांची भर टाकली होती. तसेच पाच व्यापाऱ्यांना ९० लाख रुपयांचा परतावा देण्याचे आदेश काढले होते. हा परतावा व्याजासह एक कोटी १० लाख होता. त्यामुळे ४० महिन्यांत एवढीच वसुली करण्यात यश आले होते.