‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका, स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या संस्थांचे सुमारे ७० कर्मचारी या कामाला लागले आहेत. नदीतील जलपर्णी काढताना या कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक उडाली असून केवळ काठावरील जलपर्णी काढणे त्यांना शक्य होत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणी लघुपाटबंधारे विभागाकडे पत्र पाठवून जलपर्णी काढण्याच्या कामासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने हा पत्रव्यवहार पूर्ण केला आहे.

ठाणे जिल्हय़ातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदी पात्र जलपर्णी वनस्पतीने व्यापले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची घटू लागली आहे. जलपर्णीमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होऊ लागले असून पाण्याची गुणवत्ता खालावल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या विषयावर ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये १८ फेब्रुवारीच्या अंकामध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रदूषित पाण्यामध्ये उगवणारी जलपर्णी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी उगवल्याने अनेक अभ्यासकांनी पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न निर्माण केला होता. नदीपात्रामध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी उगवलेली असतानाही महापालिकेच्या वतीने त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती.

मोहने बंधाऱ्यावर कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलत असून जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. त्यामुळे धोका नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. े ही वनस्पती काढण्यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आंदोलन करण्याचे पत्र पालिकेला दिले होते. यावर २३ फेब्रुवारी रोजी महापालिकेने कारवाई सुरू करून तसे पत्र लघुपाटबंधारे विभागाकडे पाठवले आहे. त्यामध्ये महापालिका, स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांकडून जलपर्णी काढण्यात अपयश आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केवळ काठावरची जलपर्णी काढण्यात यश..

उल्हास नदीच्या पात्रामध्ये उतरण्यास अवघड असल्याने केवळ काठावरील जलपर्णी काढण्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, आवश्यक साहित्य, छोटय़ा बोटीची व्यवस्था होत नसल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. हे कर्मचारी केवळ काठावरील जलपर्णी काढत असून मधली जलपर्णी प्रचंड प्रमाणामध्ये असून ते काढण्यास अडचणी येत आहेत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रदूषित पाण्यातील जलपर्णी काढताना ती शास्त्रोक्त पद्धतीने दूर करण्याची गरज आहे. अन्यथा पाण्यामध्ये या जलपर्णीचे गवत पडल्यास त्याचा त्रास नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

– प्रा. मनीषा कर्पे, जलअभ्यासक

(((  उल्हास नदीतील काठाच्या बाजूनेच जलपर्णी काढण्यात येत आहे.  ))