News Flash

उल्हासनगर : इमारतीच्या ४ मजल्यांचे स्लॅब तळमजल्यावर कोसळले! अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी!

उल्हासनगरमध्ये चारमजली इमारतीचे स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे.

उल्हासनगरमधील दुर्घटनाग्रस्त मोहिनी पॅलेस

उल्हासनगर शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब शनिवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने मोठा अपघात झाला. टेरेसचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत आल्याने इमारतीमधील ३० ते ३२ नागरिक यात अडकले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. काही रहिवाशांनी स्लॅब कोसळताच घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. तर १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अरुंद रस्ता आणि गल्ली असल्याने बचाव पथकांना मदत कार्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. घटनास्थळी पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

मोहिनी पॅलेस

ही इमारत १९९४ साली उभारण्यात आली होती. १९९० च्या काळात उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणावर उलवा रेतीचा वापर करून इमारती उभ्या केल्या गेल्या. यातील बहुतांश बांधकामे बेकायदा होती. याच यादीतील इमारती कोसळण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. शहरात नियमानुकूल प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे इमारतीची पुनर्बांधणी रखडली असल्याचे बोलले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 6:15 pm

Web Title: ulhasnagar building collapse incident fire brigade tdrf ndrf saves residents pmw 88
Next Stories
1 खासगी कार्यालये, गृहसंकुलांत लसीकरण
2 कठोर र्निबधांतही भाजी मंडयांमध्ये गर्दी
3 रुग्णालयातच समुपदेशन
Just Now!
X