21 September 2020

News Flash

‘मॅक्स लाईफ’कडून ३६ लाखांची जादा वसुली

लेखापरीक्षण समितीकडून प्रथमदर्शनी उघड; पालिकेकडून रुग्णालय प्रशासनाला नोटीस

(संग्रहित छायाचित्र)

लेखापरीक्षण समितीकडून प्रथमदर्शनी उघड; पालिकेकडून रुग्णालय प्रशासनाला नोटीस

उल्हासनगर : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने ठरवलेल्या दरांपेक्षा अधिकचे बिल वसूल केल्याप्रकरणी उल्हासनगर शहरातील एका खासगी रुग्णालयाला पालिकेने नोटीस पाठवली आहे. या रुग्णालयाने आकारलेल्या ८३ बिलांमध्ये पालिकेच्या लेखापरीक्षण समितीला प्रथमदर्शनी घोळ दिसून आला. याची अधिक तपासणी केली असता रुग्णालयाने तब्बल ३६ लाख ३९ हजार रुपये अधिकचे वसूल

केल्याचे दिसून आले. ही रक्कम रुग्णालयाकडून का वसूल करू नये, याबाबत खुलासा करण्यासाठी पालिकेने मॅक्स लाईफ निरो क्रिटी केअर अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.

उल्हासनगर शहरातील खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडे नोंदवण्यात आल्या होत्या. शासनाने खाटा, उपचार आणि इतर गोष्टींचे दर निश्चित केले असून त्याचे फलक रुग्णालयांबाहेर लावण्याचे आदेश पालिका प्रशासनाने रुग्णालयांना दिले होते. तसेच उल्हासनगर महापालिकेने मुख्य लेखापाल आणि लिपिक अशा दोघांची एक लेखा परीक्षण समिती रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी स्थापन केली होती. या पथकाने १ जुलैपासून शहरातील विविध खासगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली होती. पहिल्या टप्प्यात चार मोठय़ा खासगी रुग्णालयांमधील १०८ प्रकरणांवर समितीकडून तपासणी करण्यात येत होती.

यात उल्हासनगरातील मॅक्स लाईफ निरो क्रिटी केअर अँन्ड रिसर्च सेंटर या रुग्णालयातील ८२ प्रकरणे पालिकेच्या लेखापरीक्षण समितीकडे होती. या प्रकरणांमध्ये रुग्णालयाने ३६ लाख ३९ हजार ९६५ रुपये अधिकचे वसूल केल्याचा ठपका पालिकेने ठेवल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली आहे. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे. मुदतीत लेखी खुलासा न मिळाल्यास तसेच खुलासा असमाधानकारक आढळल्यास ही रक्कम कारवाई करत रुग्णालयाकडून वसूल केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी या नोटिसीद्वारे दिला आहे. तसेच राज्य शासनाच्या अधिसूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील इतर अनेक रुग्णालयांची बिले तपासले जात असून लवकरच त्याबाबतही नोटीस देण्यात येईल अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. भदाणे यांनी दिली आहे.

बिलांमध्ये लूट कशी?

शासनाच्या परिपत्रकानुसार रुग्णालयाकडे असलेल्या एकुण खाटांपैकी ८० टक्के खाटांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचार खर्चाची कमाल मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. उर्वरित २० टक्के खाटांचा खर्च खाजगी रुग्णालयांच्या प्रचलित दराने करू शकतात. त्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच बिलांमध्ये दिलेल्या रकमा कशासाठी वसूल केल्या त्याबाबत स्पष्टता नाही. अनेक बिलांमध्ये उपचार, औषधे, चाचण्यांचे दरही अधिक असल्याचे दिसून आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:23 am

Web Title: ulhasnagar civic body acts against private covid hospital for overcharging zws 70
Next Stories
1 करोना मृतांवर मोफत अंत्यसंस्कार  
2 वादळी पावसाचा धुमाकूळ
3 महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
Just Now!
X