हाणामारी, बोगस मतदान आणि दबावाच्या घटना

शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासन जंग जंग पछाडत असताना उल्हासनगर शहरात मात्र काही अप्रिय घटनांनी मतदानाला गालबोट लागले. यात माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाडीवर दगडफेक झाली तर भाजपच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आली. साई पक्षाच्या कार्यालयात महिलांना मारहाणीचा प्रकार समोर आला तर काही प्रभागात बोगस मतदानाच्या आरोपावरून वातावरण तापले होते.

मतदानाच्या पूर्वसंध्येला दाखल झालेल्या विविध गुन्ह्य़ांबाबतही राजकीय वैमनस्यातून गुन्हे दाखल झाल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही अशाच घटना होण्याची शक्यता होती. त्यानुसार सकाळपासूनच शहरात विविध प्रभागांत हाणामारी, मारहाण, बोगस मतदान आणि हल्ल्याच्या घटना समोर आल्या. माजी महापौर आणि साई पक्षाच्या उमेदवार आशा ईदनानी यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला. अज्ञातांनी गाडीवर दगड टाकल्याने गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने त्यात कुणाला इजा झाली नाही. मात्र या प्रकरणी इदनानी यांनी भाजपवर आरोप केला आहे. तसेच प्रभाग ८मध्ये भाजप, साई तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण वेळेत नियंत्रणात आले. दुपारी तीनच्या सुमारास प्रभाग क्रमांक ११ मध्ये खटनमल चौक परिसरात साई पक्षाच्या कार्यालयात ३० ते ३५ व्यक्तींनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी केला. तसेच प्रभाग ९ मधील मतदान केंद्रात केंद्रप्रमुख भाजपला मतदान करण्यासाठी सल्ला देत असल्याचा आरोप इदनानी यांनी केला.

दरम्यान, प्रभाग १७ मध्ये मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात आपल्या घराबाहेर उभ्या असलेल्या नागरिकाला पळवताना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. तर प्रभाग १५ मध्ये शिवसेना उमेदवार बोगस मतदान करीत असल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

नवख्यांचा उत्साह शिगेला..

एरवी मज्जा मस्ती करण्यात रंगलेली मंडळी मंगळवारी मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेली पाहायला मिळाली. वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तक नगर या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात तरुणांनी मतदान केल्याचे दिसून आले. वयाच्या १८व्या वर्षी सुज्ञ नागरिक म्हणून संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, अशी प्रतिक्रिया सावरकर नगर केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या प्रथमेश पवार याने दिली. त्याचबरोबर काहींनी आम्ही आमच्या परिसराच्या विकासासाठी मतदान करत आहोत,  अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.