राज्यात निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी या हेतूने तसेच योग्य व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावा यासाठी त्याचे प्रतिज्ञापत्र जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानुसार त्याचा गोषवारा मतदान केंद्रांवर लावण्यात आला होता; मात्र उल्हासनगर शहरात मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर मोजण्याइतके मतदार उमेदवारांच्या या कुंडलीकडे लक्ष देताना दिसत होते.

उल्हासनगर शहरातील राजकारणात गुन्हेगारांचा अधिक भरणा आहे असे बोलले जाते. त्यात शहराला रक्तरंजित राजकारणाचा इतिहास आहे. त्यात आपल्या उमेदवाराची इत्थंभुत माहिती मतदारांना व्हावी यासाठी त्यांच्या प्रतिज्ञापत्राचा गोषवारा मतदान केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानुसार उमेदवाराचे शिक्षण, संपत्ती, कर्ज आणि गुन्हेगारी यांची माहिती असलेला गोषवारा मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. मात्र बहुतेक मतदान केंद्रावर मतदार याकडे दुर्लक्ष करताना दिसले. फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके मतदार हा गोषवारा वाचताना दिसत होते. त्यामुळे गोषवाऱ्याच्या माध्यमातून उमेदवाराची माहिती देण्याचा पालिका आणि निवडणूक आयोगाचा प्रयत्न फोल ठरल्याचे समोर आले. मात्र अनेक ठिकाणी मोठय़ा भिंतीवर छोटय़ा अक्षरात माहिती असल्याने अनेक मतदारांनी हे वाचण्याचे टाळले. अनेक ठिकाणी मतदान करून मोकळे व्हायचे या भावनेतून आलेल्या मतदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी अतिशय अडचणीच्या जागेत हा गोषवारा लावण्यात आल्याने लोकांना तो वाचणे शक्य नव्हते. बहुतेक प्रभागात वीसपेक्षा अधिक उमेदवार असल्याने भली मोठी यादी गोषवारा स्वरूपात लावण्यात आली होती. त्यामुळे हा गोषवारा फक्त दिखाव्यापुरताच असल्याचे दिसत होते. बहुतेक मतदान केंद्रावर गर्दी नसल्याने झटपट मतदान करून निघण्याच्या मानसिकतेत मतदार दिसत होते.

१०२ वर्षांच्या धर्मगुरूंचे मतदान

१०२ वर्षांचे सिंधी समाजाचे धर्मगुरू बाबा खेमचंद यांनी प्रभाग क्रमांक११ मधून गुरू गोविंदसिंग हिंदी विद्यालयात सकाळी अकराच्या सुमारास आपले मत टाकले. त्यांच्यासोबत त्यांचा ५६ वर्षीय मुलगा जेठा खेमचंद यांनीही आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. प्रकृती अस्वास्थ्याने बाबा खेमचंद अधिक बोलू शकत नव्हते पण, तरीही मतदान कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.