उल्हासनगर महापालिका मुख्यालयात वाढदिवस साजरा

उल्हासनगर : एकीकडे करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याचे आवाहन उल्हासनगर पालिका प्रशासनाकडून केले जात असतानाच, दुसरीकडे पालिकेचे नगरसेवकच पालिका मुख्यालयामध्येच सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडवत वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी पालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेत्याच्या दालनात नगरसेवक शंकर लुंड यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी भाजप, शिवसेना, रिपाइं, साई अशा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थिती लावत गर्दी केली होती.

करोना संसर्ग रोखण्यासाठी  सुरक्षित अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन शासनाकडून सातत्याने केले जात आहे. मात्र त्यानंतरही चक्क उल्हासनगरमधील महापालिकेच्या मुख्यालयात विरोधी पक्षनेत्याच्या दालनातच सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे गुरुवारी समोर आले आहे. उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक शंकर लुंड यांचा गुरुवारी वाढदिवस होता. महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते किशोर वनवारी यांच्या कार्यालयात लुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये महापौर लीलाबाई आशान यांचे पुत्र आणि शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अरुण आशान, रिपाइं नगरसेवक उपमहापौर भगवान भालेराव, भाजप नगरसेवक जमनू पुरस्वानी, किशोर वनवारी, मनोज लासी, महेश सुखरामानी असे अनेक नगरसेवक उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबत पक्षाच्या कार्यकत्र्यांनीही या वेळी दालनात गर्दी केली होती. यातील बहुतांश नगसेवकांच्या चेहºयाला मुखपट्टी नव्हती, तर अनेकांच्या मुखपट्ट्या हनुवटीवर लावलेल्या होत्या. या वेळी नियमाचे पालन केले नसल्याची बाब छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहे. याबाबत पालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना संपर्क केला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

नियमाचा भंग नाही

वाढदिवस साजरा केलेल्या दालनाची क्षमता ३०हून अधिक व्यक्तींची असून आम्ही अवघे ८ ते ९ जण होतो. तसेच या वेळी कोणत्याही नियमाचा भंग झाला असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शंकर लुंड यांनी दिली आहे.