महाराष्ट्रामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गुरुवारी अढळून आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या करोनाग्रस्त महिलेने काही दिवसापूर्वीच शहरामधील सत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती महानगरपालिकेच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता महानगर पालिकेतील अधिकारीही गोंधळून गेले आहेत.

उल्हासनगरमधील या करोनाग्रस्त महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेने एका खास टीम तयार केली आहे. या महिलेच्या कुटुंबाला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं असून तिच्याबरोबर दुबईहून भारतामध्ये प्रवास करणाऱ्या पाच सहप्रवाशांचीही कस्तुरबामध्ये चाचणी करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संबंधित महिलेने ८ मार्च रोजी उल्हासनगरमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला दीड हजार लोकं उपस्थित असल्याची माहिती समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही महिला आपल्या कुटुंबासहित ४ मार्च रोजी दुबईहून भारतामध्ये परत आली होती. त्यानंतर या महिलेला अस्वस्थ वाटतं होतं. मात्र तरीही तिने ८ मार्च रोजी उल्हासनगरमधील एका आश्रमात पार पडलेल्या संत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये तब्बेत आणखीनच खालावल्याने तिने एका खासगी डॉक्टरची भेट घेतली. त्यांनी या महिलेला कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल होण्यास सांगितले. करोनाचा चाचणीमध्ये महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयाने या महिलेची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मागील १५ दिवसांमध्ये या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे.