साई पक्षाच्या नगरसेविकेचा नामांतरासाठी प्रस्ताव; मराठी नगरसेवकांचेही अनुमोदन

साई पक्षाच्या एका नगरसेविकेने उल्हासनगर शहराचे नाव बदलून सिंधूनगर करण्याचा प्रस्ताव पुढील आठवडय़ात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडला आहे. या प्रस्तावाला चार सिंधी नगरसेवकांसह दोन मराठी नगरसेवकांनीही अनुमोदन दिले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण महासभेत साई पक्षाच्या नगरसेविका कंचन लुंड यांनी उल्हासनगर शहराचे नाव बदलून सिंधूनगर करण्याचा खासगी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला प्रदीप रामचंदानी, मीना आयलानी, राजू जग्यासी या भाजप तर शंकर लुंड या साई पक्षाच्या सिंधी भाषिक नगरसेवकांनी अनुमोदन दिले आहे. तर रिपाइंच्या भगवान भालेराव आणि भाजपच्या राजेश वानखेडे या दोन मराठी भाषिक नगरसेवकांनीही या नामांतराच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याची माहिती मिळते आहे. या प्रस्तावाच्या निमित्ताने उल्हासनगर शहरात पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरात मराठी आणि सिंधी भाषा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

१९९० मध्ये भाजपचे तत्कालीन खासदार राम कापसे यांनी सिंधी युथ सर्कलच्या एका कार्यक्रमात उल्हासनगर शहराचे नाव सिंधूनगर ठेवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या वेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या काही शिवसेना नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा उल्हासनगर शहराचे नाव सिंधूनगर ठेवण्याबाबतचे प्रस्ताव उल्हासनगर महापालिकेच्या सभेत मांडले गेलेले आहेत. मात्र या विषयावर गोंधळ होऊ न हे विषय रखडलेले आहेत. साई पक्षाच्या नगरसेविका कंचन लुंड यांच्या या प्रस्तावामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या प्रस्तावावर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शहराला विकासापासून दूर ठेवत नामांतरसारख्या गोष्टींवर का जोर दिला जातो आहे, असा सवाल शहर शिवसेनेच्या वतीने उपस्थित केला जातो आहे. तर शहरातील पालिकेच्या कारभारात अनेक त्रुटी असून दररोज भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे समोर येत आहेत. कोणताही विकास न केलेले लोकप्रतिनिधी भावनिक विषय उपस्थित करत नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

नामांतर नको, विकास हवा

उल्हासनगर शहराच्या नामांतराचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत ठेवल्यानंतर त्याची चर्चा शहरात सुरू असून नागरिक त्यातही विशेषत: सिंधी समाज या प्रस्तावाला विरोध करताना दिसत आहेत. सध्या शहराला नावाची नाही तर विकासाची गरज आहे, असे मत समाजमाध्यमातून व्यक्त करत आहेत.